अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा झंझावात
मिलन दादा कल्याणशेट्टी नगराध्यक्ष
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षने दणदणीत विजय मिळवत नगरपरिषदेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्षपदी भाजपचे मिलन दादा कल्याणशेट्टी विजयी झाले असून, नगरपरिषदेतील एकूण २५ जागांपैकी २२ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत नगरपरिषदेत सत्ता प्रस्थापित केली आहे. विरोधी पक्षांना मर्यादित यश मिळाले असून, शिवसेना (शिंदे गट) चे दोन उमेदवार विजयी झाले आहेत, तर काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार निवडून आला आहे.
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसून आले. निकाल जाहीर होताच अक्कलकोट शहरात भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, फटाके फोडून व घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला. शहरातील प्रमुख चौक व बसस्टॉप परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
विजयानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोटकर जनतेचे आभार मानले. “हा विजय जनतेच्या विश्वासाचा कौल आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याला प्राधान्य देऊ,” असे त्यांनी सांगितले.
या निकालामुळे अक्कलकोट नगरपरिषदेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले असून, आगामी काळात पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व नागरी मूलभूत सुविधांच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

0 Comments