मोहोळच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांना साथ द्या – जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे आवाहन
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असून हा निधी प्रभावीपणे मिळवायचा असेल तर मोहोळकरांनी शिवसेना (शिंदे गट) च्या नगराध्यक्ष व सर्व २० उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
सावली बंगला, मोहोळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराचे ज्येष्ठ नेते पद्माकर आप्पा देशमुख, शिवसेनेचे पॅनल प्रमुख व पहिले नगराध्यक्ष रमेश बारसकर, सुमित पवार, श्रीकांत गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मोहोळचा विकास वेगाने करायचा असल्यास सत्ताधारी पातळीवर मजबूत समन्वय आवश्यक असल्याचे सांगताना उमेश पाटील म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात अर्थसंकल्पाची तिजोरी आहे, तर नगरविकास खात्याच्या चाव्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. मोहोळला मोठे प्रकल्प आणि भरघोस निधी हवा असेल, तर शिवसेना (शिंदे गट) ला सत्ता देणे हिताचे ठरेल.”
याच पत्रकार परिषदेत शिवसेना (शिंदे गट) चा ड्रीम प्रोजेक्ट आधारित नगरपालिका जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्यात विविध समाजघटक, व्यापारी, विद्यार्थी, महिला व दिव्यांगांसाठी अनेक उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा, मुस्लिम समाजासाठी वातानुकूलित शादीखाना, शहराची स्वतंत्र भाजी मंडई आणि लिलाव व्यवस्था, शेळ्या–मेंढ्यांचा स्वतंत्र बाजार, लहान मुलांसाठी व महिलांसाठी ‘चौपाटी’ प्रकल्प, अग्निशमन दलाची उभारणी, नगरपरिषद परिसरात कै. पंडित भाऊ देशमुख यांचा पुतळा, एमपीएससी–यूपीएससी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके व अभ्यास साहित्य, नगरपरिषद सफाई कामगारांना कायम दर्जा, व्यापारी बांधवांसाठी उद्योग भवन, मुस्लिम, लिंगायत, मातंग, धनगर, मराठा, बौद्ध व इतर समाजांसाठी स्वतंत्र सामुदायिक भवन, दिव्यांग नागरिकांसाठी ‘दिव्यांग भत्ता’ योजना यांसह अनेक घोषणा जाहीरनाम्यात दिलेल्या आहेत.
उमेश पाटील म्हणाले, “मोहोळच्या विकासासाठी हा जाहीरनामा केवळ घोषणा नसून प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. यासाठी मोहोळकरांनी शिवसेना (शिंदे गट) च्या उमेदवारांना संपूर्ण साथ द्यावी.”
उमेश पाटील यांनी शेवटी मोहोळकरांना असे आवाहन केले की, “हा वचननामा म्हणजे मोहोळसाठी नवा अध्याय. पारदर्शक, जबाबदार आणि सक्षम प्रशासन देण्याचे आम्ही मोहोळकरांना आश्वासन देत आहोत. तुमचा पाठिंबा मिळाला, तर विकासाचा नवा इतिहास घडवू.”
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घोषणांनी मोहोळचे राजकारण नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. मोहोळच्या राजकारणात या जाहीरनाम्याने आणि उमेश पाटलांच्या आवाहनाने नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत ही भूमिका नगरवासीय कशी स्वीकारतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments