राष्ट्रवादी पक्षाकडून ४२७ इच्छुकांच्या मुलाखती
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ४६५ इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले होते. मंगळवारी यातील ४२७ जणांनी राष्ट्रवादी भवनात दिवसभरात मुलाखती दिल्या. ज्यामध्ये प्राध्यापक,शिक्षक,डॉक्टर, वकील,अभियंता, उद्योजक, उच्च विद्याविभूषित युवक युवतींचा मोठा समावेश होता.
माजी महापौर आणि माजी नगरसेवक यांनी राष्ट्रवादी भवनात मुलाखतीसाठी लावलेली हजेरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
सोलापूर शहरात मंगळवारी राष्ट्रवादी पक्षाकडे उच्चशिक्षित आणि उच्चविद्याविभूषित उमेदवारांनी मुलाखती दिल्यामुळे सोलापूरच्या विकासासाठी सोलापूर महानगरपालिकेत जाण्यासाठी सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणावर आसुसलेला असल्याचे दिसून आले .
जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात मंगळवारी सकाळी १० वाजता मुलाखतीला सुरुवात झाली. दुपारनंतर मुलाखती देण्यासाठी येणाऱ्या इच्छुकांचा मोठी मांदियाळी होती. सायंकाळी आठ वाजता ४६५ इच्छुकांपैकी ४२७ जणांनी मुलाखती दिल्या.
प्रभागाची सामाजिक समीकरणे, राजकीय पार्श्वभूमी, सामाजिक कार्य, प्रवर्गानुसार कास्ट सर्टिफिकेट, निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे आदी प्रश्न इच्छुक उमेदवारांना विचारण्यात आले. सोलापूरच्या विकासासाठी झपाटलेल्या उच्चविद्याविभूषित युवक युवतींनी मात्र जोशपूर्ण आणि दमदार मुलाखती दिल्या. सोलापूर शहराची बकाल अवस्था पाहता रस्ते, वीज आणि पाणी या सार्वजनिक मूलभूत सुविधा कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपण राष्ट्रवादीच्या माध्यमातून सोलापूर महापालिकेत जाण्यासाठी इच्छुक असल्याचे अनेकांनी सांगितले.अनेक युवक युवतींची सोलापूरच्या विकासासाठी आत्मीयता आणि तळमळ दिसून येत होती.राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विकासाचे व्हिजन आणि अहोरात्र झटण्याचे त्यांचे कार्य पाहून आपणास सोलापूरच्या विकासासाठी नगरसेवक होण्याची इच्छा अनेकांनी बोलून दाखवली. दिवसभर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पक्षाच्या कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या. प्रभागनिहाय मुलाखती घेण्यात येत होत्या. त्यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी भवन इच्छुक उमेदवारांच्या गर्दीने फुलून गेले होते. आपण जरी पुण्यात कामानिमित्ताने असलो तरी सोलापूर शहराविषयी आपणास आस्था असून विकास कामात झोकून देण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितले. सोलापूर शहरातील विडी घरकुल परिसराच्या विकासासाठी तृतीयपंथीय इच्छुक उमेदवारांनी दिलेली राष्ट्रवादी भवनातील मुलाखत सर्वाच्या चर्चेचा विषय होती.
===============
इच्छुक उमेदवारांशी
यांनी साधला संवाद !
================
राष्ट्रवादीचे शहर - जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, सेवादलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत दायमा, ज्येष्ठ नेते तौफिक शेख, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे, मागासवर्गीय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत कांबळे, अल्पसंख्यांक नेते वसीम बुऱ्हाण,ज्येष्ठ नागरिक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत चौधरी,
महिला कार्याध्यक्षा चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम,
ज्येष्ठ नेते आप्पाशा म्हेत्रे
================
अजित दादांच्या विकासाचे व्हिजन सोलापूरकर इच्छुक उमेदवारांनी मनावर घेतले !
------------------------------ ------
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची महाराष्ट्रातील विकास कामांची धडपड आणि व्हिजन सर्वश्रुत आहे. त्यामुळे अजितदादांचे विकास कामाचे व्हिजन सोलापूरकर इच्छुकांनी मनावर घेतल्याचे मंगळवारच्या मुलाखतीवरून दिसून आले आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेच्या जवळपास असेल यात तिळमात्र शंका नाही. इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानंतर व सोलापूरचे संपर्कमंत्री दत्तात्रय मामा भरणे व सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांच्याशी चर्चा करून उमेदवार जाहीर करणार आहोत.
== संतोष पवार, शहर - जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ==
0 Comments