कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालयात 'राष्ट्रीय शेतकरी दिवस' साजरा
बार्शी (कटूसत्य वृत्त):- येथील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालयात २३ डिसेंबर रोजी देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय शेतकरी दिवस' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते व प्रगतशील शेतकरी तुळशीदास गव्हाणे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. बी. शिंदे यांनी भूषवले.
यावेळी मार्गदर्शन करताना तुळशीदास गव्हाणे म्हणाले की, "सध्याच्या काळात विषमुक्त अन्नाची गरज वाढली असून सेंद्रिय शेती हाच भविष्यातील योग्य पर्याय आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम घातक आहेत." विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करून ते तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. डी. बी. शिंदे यांनी नमूद केले की, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात शेतकऱ्यांचे योगदान अमूल्य आहे. बदलत्या हवामानाचे आव्हान पेलण्यासाठी कृषी विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढली असून, त्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सूरज कुलकर्णी यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. महेश गुरव यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. आशा अदलिंगे आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
0 Comments