तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय बांधकामासाठी २.१५ कोटींचा निधी मंजूर
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दहा गावांमध्ये मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी दोन कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
ग्रामविकासात जसे ग्रामसेवकांचे महत्त्व आहे, तसेच शेतकरी व नागरिकांच्या दैनंदिन महसुली कामांसाठी तलाठी व मंडल अधिकारी हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या कामकाजासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने या कार्यालयांच्या बांधकामांना प्राधान्य दिले आहे. जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत नियोजन निधीतून दोन कोटी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या निधीतून पाच मंडल अधिकारी व पाच तलाठी कार्यालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. किणी, वागदरी, वळसंग, मैंदर्गी आणि मुस्ती या पाच गावांसाठी प्रत्येकी २५ लाख रुपये मंडल अधिकारी कार्यालयासाठी मंजूर करण्यात आले आहेत. तर घोत्री, हालहळ्ळी (अ), कडबगाव, मुस्ती आणि खैराट या पाच गावांसाठी प्रत्येकी १८ लाख रुपये तलाठी कार्यालयासाठी मंजूर झाले आहेत.
या निधीमुळे तलाठी व मंडल अधिकाऱ्यांसाठी आधुनिक कार्यालये व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होतील. त्यामुळे महसुली कामकाज अधिक गतिमान होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला. या कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले.
0 Comments