भाजपा तिकीटासाठी इच्छुकांची रांग
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शहरातील २६ प्रभागांतील १०२ जागांसाठी भाजपाच्या शहर कार्यालयातून तब्बल १,०१२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले होते. त्यापैकी १३ डिसेंबरपर्यंत सुमारे ६०० अर्ज दाखल झाले असून, या अर्जांवर स्थानिक कोअर कमिटीच्या मुलाखती दि. १६ पासून सुरू झाल्या आहेत.
या मुलाखतींची जबाबदारी भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर व शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील छाननीनंतर इच्छुक उमेदवारांची यादी पालकमंत्री व स्थानिक आमदारांशी चर्चा करून अंतिम केली जाणार असून, ही यादी प्रदेश पातळीवर पाठवली जाणार आहे.
आज सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत प्रभाग क्रमांक १ ते ५ साठी मुलाखती घेण्यात आल्या, तर दुपारी ३ ते सायंकाळी ७ या कालावधीत प्रभाग क्रमांक ६ ते १० साठी मुलाखती पार पडल्या. बुधवारी प्रभाग क्रमांक ११ ते २० आणि गुरुवारी उर्वरित ६ प्रभागांसाठी मुलाखती होणार आहेत. सर्व नियम व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचे अर्जच प्रदेश पातळीवर पाठवले जाणार असून, १०२ उमेदवारांची अंतिम यादी लवकरच जाहीर होईल, अशी माहिती शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी दिली.
गेल्या चार दिवसांत विनामूल्य अर्ज वाटप केल्यामुळे इच्छुकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, अर्ज घेणाऱ्यांमध्ये मनपाचे आजी-माजी पदाधिकारी, तसेच इतर पक्षातून आलेले बडे माजी पदाधिकारी यांचा समावेश आहे. भाजपाकडूनच निवडणूक लढवण्यासाठी अनेकांनी जोरदार तयारी सुरू केली असून, काहींनी प्रदेश कोअर कमिटीकडेही शिफारसी लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
पक्षश्रेष्ठींनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांना संधी देत स्थानिक कोअर कमिटी पहिली यादी तयार करणार आहे. भाजपाच्या स्थानिक कोअर कमिटीत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा तसेच इतर पक्षश्रेष्ठींचा समावेश आहे.
दरम्यान, मुलाखतीदरम्यान शक्तीप्रदर्शन, घोषणाबाजी किंवा वाद्यवाजना टाळावीत, केवळ उमेदवाराने एकट्यानेच उपस्थित राहावे, असे आवाहन शहराध्यक्षा तडवळकर यांनी केल्यामुळे शिस्तबद्ध वातावरणात मुलाखती पार पडत असून, तरीही भाजपा कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले आहे.
चौकट
पालकमंत्री व आमदारांसोबत दुसरी फेरी
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची प्राथमिक फेरी पूर्ण झाली आहे. यानंतर दुसरी फेरी पालकमंत्री जयकुमार गोरे, निवडणूक प्रभारी व संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर अंतिम यादी प्रदेश पातळीवर पाठवली जाईल, जिथे उमेदवारांवर शिक्कामोर्तब होणार आहे.
-रोहिणी तडवळकर, शहराध्यक्षा, भाजपा, सोलापूर
जुन्या पदाधिकाऱ्यांना संधी द्या…
भाजपामध्ये अनेक वर्षे काम करणाऱ्या जुन्या पदाधिकाऱ्यांचा पक्षाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. माझ्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना सातत्याने डावलले जात आहे. मी प्रभाग क्रमांक ८ व ९ साठी मुलाखत दिली असून, पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्यावा.
- पांडुरंग दिड्डी, भाजपा नेते
.png)
0 Comments