Hot Posts

6/recent/ticker-posts

उत्तर सोलापूर तहसील कारवाईच्या रडारवर

 उत्तर सोलापूर तहसील कारवाईच्या रडारवर


उत्तर सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उत्तर सोलापूर तहसील कार्यालय सध्या गंभीर आरोपांमुळे कारवाईच्या रडारवर आले आहे. तहसीलदारांसह विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात येत असून, तहसीलदारांवर नेमकी कोणती कारवाई होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाकडे तालुक्यातील ३६ गावे तसेच सोलापूर शहराचा काही भाग जोडलेला असल्यामुळे दररोज नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, या कार्यालयातील कामकाज वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. रेशन कार्ड वितरणातील संथ व त्रुटीपूर्ण कारभारामुळे नागरिकांना अनेक महिने हेलपाटे मारावे लागले. नवीन अधिकाऱ्यांमुळे काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे सांगितले जात असले तरी, कार्यालयप्रमुख म्हणून तहसीलदार निलेश पाटील यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

या संदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत तहसीलदारांविरोधातील तक्रारी सभागृहात मांडल्या. त्याची दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तहसीलदार पाटील यांच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, ही घटना ताजी असतानाच उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने कार्यालयाच्या कारभारावर अधिकच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित प्रकरणात लाच मागितल्याचा आरोप असल्याने हे कार्यालय कर्मचाऱ्यांनाही त्रास देत असल्याचे उघड झाले आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून तसेच शहरातून तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडायच्या कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोलापूरसारख्या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी असलेल्या या कार्यालयावर जिल्हाधिकारी कार्यालयाचेही लक्ष असतानाही अशा प्रकारचा कारभार सुरू असणे म्हणजे थेट आव्हान असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Reactions

Post a Comment

0 Comments