एस. पी. प्रतिष्ठानतर्फे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर एस. पी. प्रतिष्ठान व भीम युवक क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या उपक्रमाचे आठवे वर्ष असून, या सोहळ्यात आठ जोडप्यांनी विवाहबंधनात अडकत आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. सामाजिक बांधिलकी जपत, साधेपणा आणि एकोप्याचा संदेश देणारा हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन सिद्धेश्वर पांडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर समीर पांडगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. विवाह सोहळ्यादरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी रमाबाई पांडगळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
या प्रसंगी पद्मश्री खासदार उज्वल निकम, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, मिहीर सोलापूरकर, सिंहगड कॉलेजचे प्रा. शंकर नवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे, बाबुराव जमादार (माजी नगरसेवक), प्रथमेश कोठे (अतिक्रमण अधिकारी), जगन्नाथ बनसोडे, सुरेश बिद्री (माजी नगरसेवक), शशिकांत कंची, श्रीकांत गायकवाड (माजी नगरसेवक), संजय कोळी, बाळासाहेब नष्टी, राजकुमार पाटील, प्रणव लोंढे, जोडभावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी, डॉ. ऋतिक जायकर, अंबादास नडगेरी, दीपक बनसोडे, संघपाल काकडे, अध्यक्ष योगेश शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून सामुदायिक विवाह सोहळ्यांचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवरील खर्चाचा ताण कमी होतो, तसेच समाजात एकोप्याची भावना निर्माण होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. एस. पी. प्रतिष्ठान व भीम युवक क्रीडा मंडळ यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
विवाह सोहळ्यानंतर वर-वधू, नातेवाईक व उपस्थित पाहुण्यांसाठी स्वादिष्ट जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्याने सोलापूर शहरात सामाजिक सलोख्याचा आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण केला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
.png)
0 Comments