24 नगरपरिषदा, 154 सदस्यपदांसाठी मतदानाचा सुधारित कार्यक्रम; 20 डिसेंबरला मतदान
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकी संदर्भात असलेल्या गोंधळाबाबत राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाची बातमी दिली आहे. 24 नगरपरिषदा आणि 154 सदस्यपदांसाठी मतदानाचा सुधारित कार्यक्रम 20 डिसेंबर रोजी जाहीर केला आहे.
त्यामुळे उर्वरित 222 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींसाठी मतदान ठरल्याप्रमाणे मंगळवारी (2 डिसेंबर) होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील झालेल्या प्रकरणांसंदर्भात 23 नोव्हेंबर किंवा त्यानंतर निर्णय आलेल्या 24 नगराध्यक्षपदांच्या आणि विविध ठिकाणच्या 154 सदस्यपदाच्या जागांवरील निवडणुकांची प्रक्रिया अपील कालावधीनंतरच्या पुढील टप्प्यापासून सुधारित कार्यक्रमानुसार राबवली जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने कळवले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबरला जाहीर केला होता. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर रोजी किंवा त्यानंतर आल्याने संबंधित ठिकाणी सुधारित कार्यक्रमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदासंदर्भातील अपिलांचा निकाल उशिरा आलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया सुधारित कार्यक्रमानुसार राबवली जाईल. नगराध्यक्षपदासोबतच सदस्यपदांची एकत्रित निवडणूक घेण्याची कायद्यात तरतूद आहे. ज्या ठिकाणी सदस्यपदासाठी अपील होते तिथे त्या जागेपुरताच सुधारित निवडणूक कार्यक्रम राबवला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीसाठी पुन्हा निवडणूक होणार आहे. या नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपमध्ये अलीकडेच प्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला होता. मात्र, आयोगाच्या निर्णयाने भाजपचा जल्लोष क्षणभंगुर ठरला आहे.
0 Comments