जिल्हा निबंध स्पर्धेत कोन्हेरीची कांबळे प्रथम
मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, कोन्हेरी येथील विद्यार्थीनी मेहक समाधान कांबळे हिने जिल्हास्तरीय मोठा गट निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून कोन्हेरी गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.मेहक हिने यापूर्वी कोन्हेरी केंद्रस्तरीय स्पर्धेत तसेच मोहोळ तालुकास्तरीय (कामती येथे पार पडलेल्या) स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळविला होता.
११ नोव्हेंबर रोजी शिक्षण विभाग सोलापूर व पंचायत समिती शिक्षण विभाग पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यापक विद्यालय, पंढरपूर येथे जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणवत्ता शोध चाचणी आणि विविध स्पर्धा पार पडल्या. या निबंध स्पर्धेत जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधून २२ विद्यार्थी सहभागी झाले होते.
“शिक्षणाचे महत्त्व” या विषयावर मेहक हिने उत्कृष्ट लेखन सादर करून परीक्षकांची मने जिंकली आणि जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. तिला राजेंद्र सरवदे सर यांनी मार्गदर्शन केले.या यशाबद्दल मोहोळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक, विस्ताराधिकारी बंडू शिंदे, केंद्रप्रमुख ऋषिकेश जगताप, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र वाघमारे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय भैय्या जरग, उपाध्यक्ष दशरथ रंदवे तसेच समिती सदस्य व कोन्हेरी ग्रामस्थांनी मेहकचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
मेहकच्या या उल्लेखनीय यशाने कोन्हेरी शाळेचा आणि संपूर्ण मोहोळ तालुक्याचा गौरव वाढविला आहे.

0 Comments