Hot Posts

6/recent/ticker-posts

करमाळ्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी प्रचंड चुरस निर्माण

 करमाळ्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी प्रचंड चुरस निर्माण


करमाळा (कटूसत्य वृत):- करमाळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. भाजपकडून दोन नावांची जोरदार चर्चा सुरू असून, ती नावे म्हणजे जयश्री घुमरे आणि सुनीता देवी.

जयश्री घुमरे या भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांच्या मावशी आहेत. तसेच त्या विद्या आम्ही विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या पत्नी आहेत. दुसरीकडे, नगराध्यक्षपद डोळ्यासमोर ठेवून अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी यांनाही उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत.

भाजपचे निवडणूक प्रभारी व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपचाच असणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष भाजपच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे. रश्मी आणि दिग्विजय बागल हे आपल्या मावशी जयश्री घुमरे यांच्या उमेदवारीसाठी सक्रिय आहेत, अशी चर्चा पक्षात सुरू आहे.

दरम्यान, करमाळ्यातील राजकारणात सध्या तिरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदादेवी जगताप यांची उमेदवारी जगताप गटाकडून जाहीर झाली आहे, तर सावंत गटाकडून माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या पत्नी मोहिनी सावंत यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे.

जगताप व सावंत गट एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू असले तरी काही कार्यकर्त्यांच्या हालचालींमुळे दोन्ही गट एकत्र येतील की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात काही तडजोडी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
करमाळा नगराध्यक्षपदासाठी कोणाचे पारडे जड ठरणार जयश्री घुमरे की सुनीता देवी हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments