Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजप-विठ्ठल परिवारात नगराध्यक्षपदाचा पेच; सात इच्छुकांमुळे भाजपमध्ये गोंधळ

 भाजप-विठ्ठल परिवारात नगराध्यक्षपदाचा पेच; सात इच्छुकांमुळे भाजपमध्ये गोंधळ


पंढरपूर (कटूसत्य वृत):- पंढरपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, गराध्यक्षपदासाठी भाजप आणि विठ्ठल परिवार या दोन्ही आघाड्यांमध्ये तीव्र चुरस निर्माण झाली आहे. जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने इच्छुकांची संख्या वाढली असून, भाजपकडून तब्बल सात इच्छुकांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. तर दुसरीकडे, विठ्ठल परिवाराकडून भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.

भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी साधना भोसले, वैशाली वाळूजकर, श्यामल सिरसट, सीमा अधटराव यांच्यासह सात इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी तीन नावे वरिष्ठांकडे पाठविल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने ही निवडणूक कमळ चिन्हावरच लढवण्याचा निर्णय घेतला असून, त्याची पुष्टी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे.

माजी आ.प्रशांत परिचारक यांना उमेदवार निवडीचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे अंतिम निर्णय त्यांच्या आणि पालकमंत्र्यांच्या चर्चेनंतर होणार असल्याचे समजते.दुसरीकडे, पाच वर्षांपूर्वी फुटलेला विठ्ठल परिवार यानिमित्ताने पुन्हा एकत्र आला आहे. पाटील, कल्याणराव काळे, अनिल सावंत, दिलीप धोत्रे आदी नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत. मात्र, आमदार पाटील यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.

विठ्ठल परिवाराकडून प्रणिता भालके यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असले तरी, राजकीय तडजोड म्हणून ऐनवेळी नवे नाव समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी पालकमंत्री गोरे,माजी आमदार परिचारक आणि माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. भोसले यांनी विठ्ठल परिवाराची साथ सोडल्याने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

शहरातील खड्डेग्रस्त रस्ते,वाढते अतिक्रमण, चंद्रभागा नदीचे प्रदूषण, उपनगरांतील सोयींचा अभाव आणि ड्रेनेजमधील घाण पाणी रस्त्यावर वाहणे या समस्या नागरिकांच्या नाराजीत भर घालत आहेत. त्यामुळे कोणत्याही उमेदवारासमोर लोकाभिमुख आराखडा सादर करण्याचे मोठे आव्हान आहे.

काँग्रेसने स्वतंत्र आघाडीच्या शक्यतेवर चर्चा सुरू केली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर यांनी नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केला आहे. शिंदे गटाची शिवसेना विठ्ठल परिवारासोबत आहे, तर ठाकरे गटात संभ्रम आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

यंदाची निवडणूक भाजप आणि विठ्ठल परिवार यांच्यातील चुरशीची लढत ठरणार आहे. दोन्ही बाजूंनी सर्व शक्ती पणाला लावली असून, येणाऱ्या दोन-तीन दिवसांत नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यावर खरे राजकीय चित्र स्पष्ट होईल.



Reactions

Post a Comment

0 Comments