Hot Posts

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ पत्रकार मुजावर यांचे अल्पशा आजाराने निधन

 ज्येष्ठ पत्रकार मुजावर यांचे अल्पशा आजाराने निधन 

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूरातील ज्येष्ठ पत्रकार आणि दै. लोकसत्ताचे प्रतिनिधी एजाजहुसेन मुजावर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५९ वर्ष होते. त्यांच्या निधनाने सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातील एक अभ्यासू, निस्पृह आणि धाडसी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
■ आज संध्याकाळी अंत्यविधी
आज संध्याकाळी ६ वाजता त्यांचे पार्थिव थोरला मंगळवेढा तालीम, उत्तर कसबा येथील राहत्या घरातून जडेसाब कब्रस्तान, अक्कलकोट रोड येथे नेऊन दफनविधी पार पडणार आहे.
■ ३८ वर्षांचा तेजस्वी पत्रकारितेचा प्रवास समाप्त
मुजावर यांनी आपला पत्रकारितेचा प्रवास ‘संचार’मध्ये सुरू केला. त्यांना स्व. रंगाअण्णा वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले. गेल्या ३८ वर्षांत त्यांनी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय घडामोडींवर अचूक, निस्पृह आणि निर्भीड लेखणी चालवली.
विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचा थेट संपर्क असल्याने अनेक महत्त्वाच्या बातम्यांचे ते विश्वसनीय स्रोत मानले जात. सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील घटनांचा “चलता-बोलता संदर्भग्रंथ” म्हणून त्यांची ओळख होती.
■ पत्रकारांसाठी मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व
मुजावर यांची शैली निरपेक्ष आणि धाडसी होती. स्थानिक नेते, प्रशासकीय अधिकारी तसेच नवोदित पत्रकार त्यांच्याकडे नियमित सल्ल्यासाठी धाव घेत. बातमीचा संदर्भ, पार्श्वभूमी किंवा विश्लेषण—याबाबत मुजावर यांचे मार्गदर्शन पत्रकारांसाठी दिशादर्शक ठरत असे.
■ आजारपणाशी झुंज अपुरी
तीन महिन्यांपूर्वी त्यांना विस्मृतीचा त्रास सुरू झाला. वैद्यकीय तपासणीत मेंदूवर गाठ असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. काही दिवस प्रकृती सुधारली होती; मात्र मागील आठवड्यापासून पुन्हा त्रास सुरू झाला. आज सकाळी त्यांना सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु गुरुवार सकाळी ९.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारितेतील एक महत्त्वाची पोकळी त्यांच्या निधनानंतर निर्माण झाली असून, पत्रकार व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments