कॉरिडॉर, रस्ते आणि बकालपणा — पंढरपूर निवडणुकीची मुख्य अजेंडा
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- यंदाच्या पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली असून शहरातील बकालपणा, धूळ, अर्धवट कामे आणि विकासाचा अभाव या मुद्द्यांवर विरोधक प्रशासन व सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यास सज्ज झाले आहेत. इतर तीर्थक्षेत्रांच्या तुलनेत पंढरपूरचा विकास मंदावल्याचा आरोपही विरोधकांकडून जोरदारपणे केला जात आहे.
यंदा प्रचारासाठी कमी कालावधी मिळाल्यामुळे नगराध्यक्ष पदाचे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार घराघरांत जाऊन मतदार संपर्कात व्यस्त आहेत. सत्ताधारी भाजप, तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि विठ्ठल परिवर्तन विकास पॅनल यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र अधिक स्पष्ट होणार असून अनेक प्रभागांमध्ये तिरंगी आणि चौरंगी लढतीची चिन्हे दिसत आहेत.
नगराध्यक्षपदासाठी भालके विरुद्ध शिरसट विरुद्ध साबळे
तीर्थक्षेत्र विकास आघाडी: डॉ. प्रणिता भालके
भाजप : श्यामल शिरसट
विठ्ठल परिवर्तन विकास पॅनल: सारिका साबळे
भाजपने यंदाची निवडणूक अधिक ताकदीने लढवण्यासाठी पक्षाचे चिन्ह वापरण्याचा निर्णय घेतला असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीने आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक एकत्र आले आहेत. निवडणुकीचे सूत्रही पालकमंत्र्यांनी आपल्या हाती घेतले आहे.
विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांचा जोरदार हल्ला
विरोधकांनी शहरातील बकालपणा, धूळ, अर्धवट विकासकामे, चंद्रभागेच्या वाळवंटातील अस्वच्छता अशा मुद्द्यांवर जोरदार आवाज उठवला आहे.
* शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था
* अनेक कामे वर्षानुवर्षे अपूर्ण
* नामसंकीर्तन सभागृहाचे काम अद्याप रखडलेले
* पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था
राज्यात आणि स्थानिक पातळीवर भाजपची सत्ता असताना शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत.
मंदिर परिसरातील ६५० हून अधिक मालमत्ता पाडून कॉरिडॉर प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावावर सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा मंदावली असली तरी अनेक प्रभागांत हा मुद्दा पुनश्च उफाळून आला आहे. अलीकडेच या विरोधात सतत आंदोलने झाली होती. हा मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंढरपूर नगरपरिषदेवर अनेक वर्षांपासून परिचारक गटाचे वर्चस्व असून यंदा हा गट भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक हे प्रचारात सक्रिय असून त्यांच्या बैठका आणि भाषणांकडे मतदारांचे लक्ष वेधले आहे.

0 Comments