महापालिकेची बेवारस वाहन हटाव मोहीम सुरूच - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 11, 2025

महापालिकेची बेवारस वाहन हटाव मोहीम सुरूच

 महापालिकेची बेवारस वाहन हटाव मोहीम सुरूच


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महानगरपालिकेच्या आदेशानुसार शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर दीर्घकाळ उभी असलेली बेवारस वाहने हटविण्याची मोहीम सोलापूर शहरात सुरू करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे व पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या निर्देशानुसार ही मोहीम आज, दिनांक ११ नोव्हेंबर रोजी विविध भागांमध्ये राबविण्यात आली.

विभागीय कार्यालय क्र. ८ च्या हद्दीत आजच्या कारवाईदरम्यान पाच वाहनांवर कारवाई करण्यात आली. शानदार चौक येथे दीर्घकाळ उभा असलेला आयशर ट्रक जप्त करण्यात आला, तर गुरुनानक चौक पोस्ट ऑफिस परिसरातील व कुर्बान हुसेन नगर परिसरातील दोन रिक्षा उचलून दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय भद्रावती पेठ आणि मोदी कब्रस्तान परिसरातील चारचाकी वाहने त्यांच्या मालकांनी स्वतः काढून घेतली.

ही कारवाई अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत महानगरपालिका मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक (वाहन विभाग) अनिल चारटे, आरोग्य निरीक्षण निरीक्षक आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त पथकाने सहभाग घेतला.

महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक रस्त्यावर दीर्घकाळ वाहने उभी ठेवू नयेत. अन्यथा संबंधित वाहनांवर ₹१०,००० दंड, टोविंग शुल्क, तसेच लिलावाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मनपाने दिला आहे.

ही मोहीम पुढील काही दिवस सोलापूर शहरातील सर्व विभागांमध्ये सुरू राहणार असून, नागरिकांनी सहकार्य करून शहर स्वच्छ, सुरक्षित आणि वाहतूक सुलभ ठेवण्यासाठी प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages