दर्जेदार व वेळेत कामी पूर्ण करा - आयुक्त डॉ.ओम्बासे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 11, 2025

दर्जेदार व वेळेत कामी पूर्ण करा - आयुक्त डॉ.ओम्बासे

 दर्जेदार व वेळेत कामी पूर्ण करा - आयुक्त डॉ.ओम्बासे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील सुरू असलेल्या महत्त्वाच्या विकासकामांची सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि सार्वजनिक सोयी-सुविधा यांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ही पाहणी महत्त्वपूर्ण ठरली.

सर्वप्रथम आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी भैया चौक येथील रेल्वे ब्रिज संदर्भात प्रत्यक्ष पाहणी केली. हा ब्रिज पाडण्यात येणार असून, त्या ठिकाणी पर्यायी मार्ग म्हणून ५४ मीटरचा नवीन रस्ता सुरू करण्याबाबत  मध्य रेल्वे सोलापूरचे मंडल रेल्वे प्रबंधक डॉ. सुजीत मिश्रा यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. आयुक्तांनी पर्यायी मार्गाचे काम त्वरित सुरू करून नागरिकांना वाहतुकीत दिलासा देण्यावर भर दिला.

यावेळी टिकेकरवाडी रेल्वे स्टेशनच्या विस्तारिकरणाबाबत देखील चर्चा झाली. या स्टेशनला जोडणारा रस्ता कुमठा गाव व होटगी रोडशी जोडणाऱ्या अप्रोच रोड संदर्भातही विस्तृत चर्चा झाली. आयुक्तांनी या प्रकल्पामुळे शहराच्या पूर्व भागातील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होईल, असे मत व्यक्त केले.

यानंतर डॉ. ओम्बासे यांनी ६ कामना परिसरातील नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामांची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, या कामामुळे परिसरातील पावसाचे पाणी सहज प्रवाहित होऊन पाणी साचण्याची समस्या दूर होईल. संबंधित अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

त्यानंतर आयुक्तांनी स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या ‘अ‍ॅडव्हेंचर पार्क’ ला भेट दिली. नुकताच हा पार्क नागरिकांसाठी खुला करण्यात आला असून, आयुक्तांनी पार्कमधील सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि देखभालीसंबंधी तपासणी केली. त्यांनी पार्क परिसर अधिक आकर्षक व सुरक्षित ठेवण्यासाठी संबंधित विभागाला मार्गदर्शन केले.

यानंतर रंगभवन प्लाझा येथील स्वच्छता, प्रकाशयोजना व सुशोभीकरणाच्या कामांची माहिती घेतली. तसेच समाचार चौक येथे सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामांची पाहणी करताना त्यांनी चौकात सुंदर सीटिंग एरिया, गार्डन आणि लाईटिंगच्या सुविधांमुळे तो परिसर आकर्षक व नागरिकांसाठी विश्रांतीयोग्य ठरेल, असे नमूद केले.

आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी सर्व पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांना दर्जेदार कामे वेळेत पूर्ण करण्याच्या आणि परिसरातील अतिक्रमण तत्काळ हटविण्याच्या सूचना दिल्या.

या पाहणीदरम्यान उपायुक्त आशिष लोकरे, एस. एच. मलभागे (Sr. DEN-Co), योगेश पाटील (वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक), ब्रजेश राय (वरिष्ठ मंडल परिचालन प्रबंधक), रामलाल प्यासे (Sr. DME), भोसले (AEN), नगर अभियंता सारिका आकूलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, उद्यान प्रमुख स्वप्नील सोलनकर, सागर कुरसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आयुक्तांच्या या पाहणीमुळे शहरातील विकासकामांना नवचैतन्य प्राप्त झाले असून, मनपाच्या नियोजनबद्ध आणि दर्जेदार कामांमुळे नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages