प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी संधी दिल्यामुळेच अजय कुर्डे रिंगणात
विजयी झाल्यानंतर श्री सिद्ध नागेश यांच्या मंदिरांच्या सोयीसुविधांसाठी प्रयत्नशील राहण्याचे कुर्डे यांचे अभिवचन
मोहोळ (साहिल शेख):- मोहोळ शहराच्या पूर्वेकडील भागातील राजकीय दृष्ट्या सातत्याने सकारात्मक चर्चेने केंद्रस्थानी असलेल्या प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणूक लढविण्यासाठी अनेक दिग्गजांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यापूर्वीचा प्रभाग क्रमांक एक आणि आणि प्रभाग क्रमांक पाच अशी मिळून नव्याने प्रभाग क्रमांक दोनची निर्मिती झाली आहे. या प्रभागात गेल्या दीड दशकापासून सातत्याने सर्वसामान्यांच्या सेवेत असलेल्या आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कुर्डे परिवारातील अजय अनिल कुर्डे हे शिवसेना शिंदे पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.
युवा नेते अजय कुर्डे यांनी गत वेळी देखील नगरपरिषदेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना केवळ सतरा मतांनी निसटता पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे अजय कुर्डे यांनी गेल्या दहा वर्षात प्रभागात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क ठेवून सर्वसामान्यांशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी विभागाचे राज्याचे नेते रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली ते या प्रभागासह संपूर्ण पूर्व भागातील परिसरात कार्यरत आहेत.
त्यांची उमेदवारी या प्रभागात अत्यंत जमेची बाब असून धनुष्यबाण चिन्हाच्या पाठबळावर आणि कुर्डे परिवाराच्या आजवरच्या आजातशत्रू वाटचालीच्या जोरावर अजय हे नक्कीच विजयश्री खेचून आणणार असा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे त्यासाठी या प्रभागातील शिवसेनेचे धनुष्यबाणाचे शिलेदार अंग झटकून कामाला लागले आहेत.
चौकट
अजय कुर्डे यांनी या प्रभागातील महिलांच्या सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न सोडविण्याबरोबर सर्व समाज बांधवांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या मंदिरांच्या सोयी सुविधा वाढवण्यासाठी देखील प्रयत्न केला आहे. विशेष श्रद्धेची बाब म्हणजे केवळ मोहोळ शहराचेच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील जागृत देवस्थान असलेले श्री नागनाथ मंदिर याच प्रभागाच्या कक्षेत येते. त्यामुळे श्री नागनाथ महाराजांच्या सेवेसाठी सातत्याने तत्पर असलेल्या कुर्डे परिवाराला निवडणूक लढविण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली आहे.या प्रभागातून निवडणूक लढवून विजयी होऊन या मंदिर परिसरातील सोयी सुविधांसाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी शासन स्तरावरून निधी खेचून आणण्यासाठी आपण आपली सर्व राजकीय ताकद आणि संपर्कशक्ती पणाला लावू असे अभिवचन यावेळी अजय कुर्डे यांनी दिले.

0 Comments