मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट, परळीच्या बड्या नेत्याचं कनेक्शन
जालना (कटूसत्य वृत्त):- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे. मनोज जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचला जात आहे. याप्रकरणी दोन संशयितांना जालना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. यासंदर्भात मध्यरात्री मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत जालना पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी जालना पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. याप्रकरणी जालना पोलिसांनी २ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. मनोज जरांगेंच्या हत्येची ऑफर देणारा बडा नेता बीडच्या परळीतील असल्याची माहिती उघड झाली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात बीडच्या परळीमधील एका बड्या नेत्याचा हात असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी ज्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या एका सहकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. बीडमध्ये मनोज जरांगेच्या हत्येचा कट रचण्यासाठी बैठका पार पडल्या. याप्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतले. अमोल खुणे आणि दादा गरुड असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत. अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचे सांगितले जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला असून त्यासाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात जरांगेचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील अधिकृत भूमिका मांडतील नंतरच मी माध्यमांसमोर बोलेल तोपर्यंत मी बोलणार नाही असे गंगाधर काळकुटे भूमिकेवर ठाम आहेत.
मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गंगाधर काळकुटे म्हणाले की, 'या विषयावर मी कुठलंही भाष्य करणार नाही. मनोज जरांगे पाटील हे भूमिका मांडतील. मात्र या विषयावर मी आज कुठलंही भाष्य करणार नाही. माफ करा मी आज बोलणार नाही. जरांगे पाटील त्यांची भूमिका मांडतील मग मी माझी भूमिका मांडेल.' पोलिस सध्या या प्रकरणाची माहिती घेत असून तपास करत आहेत.

0 Comments