सोलापुरात सराफ, विधिज्ञ आणि हॉटेल व्यावसायिकांच्या
घरांवर आयकर विभागाची छापेमारी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-बुधवारी सकाळी आठच्या सुमारास सराफ बाजारातील दोन ज्वेलर्स तसेच शहरातील एका नामांकित विधिज्ञ आणि हॉटेल व्यावसायिक यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने एकाचवेळी कारवाई सुरू केली. पुणे आणि कोल्हापूर विभागातील पथकांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केल्याची माहिती समोर येते.
छापेमारीदरम्यान संबंधित व्यावसायिकांच्या कागदपत्रांची, रोकडव्यवहारांची आणि डिजिटल नोंदींची तपासणी करण्यात येत आहे. काही ठिकाणी पथकांनी लॉकर आणि सेफ उघडून तपासणी केल्याचे स्थानिक सूत्रांकडून समजते. ही कारवाई सकाळपासून सुरू असून दुपारपर्यंत ती कायम ठेवण्यात आली होती.
माध्यमांना चित्रीकरणास मनाई केल्यानंतर काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी रस्ते अडवून संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला. बाजारातील व्यापारी वर्गातही या अचानक पडलेल्या छाप्यानंतर चर्चा रंगल्या आहेत.
आयकर विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील तपशील जाहीर करण्यात येतील, अशी प्राथमिक माहिती पथकातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, संबंधित व्यावसायिकांनी सहकार्य करत असल्याचे समजते.

0 Comments