Hot Posts

6/recent/ticker-posts

पाटलांनी थिटेंच्या माध्यमातून इतिहास घडविला

 पाटलांनी थिटेंच्या माध्यमातून इतिहास घडविला 

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी अखेरच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उज्वला थिटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या नाट्यमय घडामोडींमुळे उमेश पाटलांनी उज्वला थिटेंच्या माध्यमातून इतिहास घडविला अशी चर्चा मोहोळ तालुक्यात जोरदार सुरू झाली.

मागील आठ दिवसांपासून थिटेंना उमेदवार अर्ज भरण्यासाठी पोलिस संरक्षण मिळत नव्हते. त्याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन आणि उज्वला थिटे यांनी सोशल मीडियाद्वारे आवाज उठविल्यानंतर राज्याच्या निवडणूक आयोगाने दखल घेऊन तात्काळ पोलिस बंदोबस्त देण्याचे आदेश दिले. या नाट्यमय घडामोडी मध्ये रात्री घडल्यानंतर उज्ज्वला थिटे पोलिस बंदोबस्तात पहाटे पाच वाजता अनगर नगर पंचायत कार्यालयात पोहोचल्या. 

अनगर नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून नुकतेच पक्षात आलेले माजी आमदार राजन पाटील यांच्या धाकट्या सूनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात कोण निवडणूक लढविणार याची उत्सुकता होती, ती आज संपली. प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात अनगरमधीलच उज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे या निवडणुकीबाबत मोहोळ तालुक्यासह संपूर्ण राज्यात प्रचंड उत्सुकता होती. कारण अनगर ग्रामपंचायतीची स्थापनेपासून म्हणजेच देश स्वतंत्र झाल्यापासून बिनविरोधची परंपरा होती. त्यामुळे नगरपंचायतीचा नगराध्यक्ष बिनविरोध होणार की निवडणूक लागणार, याबाबत उत्सुकता होती. मात्र, उज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केल्याने ही परंपरा मोडीत निघते का नाही हे अर्ज छाननी नंतर कळेलच.

अनगरमधील उज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनगर नगरपंचायतीची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. गेली तीन ते चार दिवसांपासून त्या उमेदवारी अर्ज भरायला अनगरमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार राजन पाटील, बाळराजे पाटील व अजिंक्यराणा पाटील यांच्या समर्थकांकडून त्यामध्ये अडथळे आणले जात होते. पोलिसांकडून बंदोबस्ताची मागणी करूनही बंदोबस्त दिला जात नव्हता, असा आरोप उज्वला थिटे यांनी केला होता.

अनगरच्या नगराध्यक्षाची बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी आपल्यावर उमेदवारी अर्ज भरू नये, यासाठी अडथळे आणले जात आहेत. राजन पाटील यांच्या माणसांकडून जाणूनबुजून त्रास दिला जात आहे, असा आरोप थिटे यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते.

काही वैफल्यग्रस्त व गेट केन लोक अनगर पंचक्रोशीतील लोकांना बिघाडविण्याचे काम करत आहेत. परंतु या पंचक्रोशीतील जनता ही सुज्ञ आहे. येत्या काळात हीच या विघ्नसंतोषी लोकांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. - माजी आमदार राजन पाटील

Reactions

Post a Comment

0 Comments