मोहोळमध्ये ‘सत्याचा विजय’: बारसकरांच्या अर्जावरील हरकती न्यायालयात कोसळल्या; विरोधकांचा खोटारडेपणा उघड
एकमेव अर्जावर हरकत घेऊन जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव फसला; ३ तारखेला जनता तिसऱ्यांदा तोंडावर पाडेल– रमेश बारसकर
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ नगरपरिषद निवडणूक 2025 साठी 186 अर्ज दाखल झाले असताना एकच अर्ज विरोधकांच्या डोळ्यांत खुपला तो म्हणजे रमेश नागनाथ बारसकर यांच्या उमेदवारीचा. बाकी 185 अर्जांवर कोणतीही हरकत न घेता फक्त बारसकर यांच्या अर्जावरच विरोधकांनी आक्षेप नोंदवला आणि छाननी प्रक्रियेच्या दिवशीच जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी बारसकर यांचा अर्ज बाद होणार फौजदारी गुन्हा लपवला आहे अशा अफवा पसरवण्याचा प्रयत्न सुरू केला. निवडणूक निर्णय अधिकारी निलेश पाटील यांनी मात्र कागदोपत्री तपासणी करून त्यांचा अर्ज पूर्णपणे कायदेशीर व वैध असल्याचे स्पष्ट करत हरकत तत्काळ फेटाळून लावली.
परंतु कुटिल राजकारणाची सवय जडलेल्या विरोधकांनी यानंतरही माघार घेतली नाही. न्यायालयाचे दार ठोठावून पुन्हा एकदा अर्ज बाद होणार अशी भीती पसरवून मोहोळच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याची मोहीम राबवली. मागील तीस वर्षांपासून विरोधकांनी कोणताही मुद्दा नसताना केवळ खोट्या आरोपांच्या आधारावरच राजकारण केले आहे, अशी टीका बारसकर यांनी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, लोकांचा पाठिंबा मिळत नसल्यामुळे विरोधकांना विकासाचे मुद्दे न बोलता खोटे आरोप करूनच निवडणूक काढावी लागते. परंतु यावेळीही न्यायालयाने विरोधकांची याचिका फेटाळून लावत सत्याचीच बाजू घेतली आणि खोटारड्यांना तोंडावर पाडले.
निकालानंतर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते व पॅनल प्रमुख रमेश बारस्कर म्हणाले की,आज 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या पवित्र दिवशी सत्याचा विजय झाला आहे. माझ्या अर्जावर घेतलेल्या सर्व हरकती फोल ठरल्या आहेत. शहरातील जनताही 3 तारखेला विरोधकांना तिसऱ्यांदा तोंडावर पाडेल याबद्दल मला ठाम विश्वास आहे.त्यांनी पुढे सांगितले की, मोहोळ शहरात मशाल शोधायला सुद्धा मिळत नाही. प्रभाग 4 मध्ये उमेदवारच मिळेना म्हणून तुतारीने फेटाळलेला उमेदवार उभा करावा लागला. काही वार्डांमध्ये एकाच चिन्हाचे तीन-तीन उमेदवार उभे राहण्याची लाजिरवाणी वेळ विरोधकांवर आली आहे. त्यामुळे धनुष्यबाणाची तुलना मशालीशी करण्याचा प्रश्नच नाही. खरी लढत म्हणजे धनुष्यबाण विरुद्ध भाजप आणि अनगरकर असेच असल्याचे ते म्हणाले.
मोहोळचा विकास थांबवण्याचे पाप विरोधकांनी केल्याचा आरोप करताना बारसकर म्हणाले की,शहराला बसस्थानक, उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल, पाणीपुरवठा आणि रस्त्यांचे जाळे यांसारख्या मूलभूत सुविधा आजवर मिळाल्या नाहीत, कारण माजी आमदार आणि अनगरकरांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मोहोळला वर्षानुवर्षे वंचित ठेवणाऱ्या अशा लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आली असून, ज्यांना भाजपाला हरवायचे आहे त्यांनी कुठेही मत वाया न घालवता फक्त आणि फक्त धनुष्यबाणावर मत टाकावे, असे आवाहन त्यांनी केले.
त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवरत्न दीपक गायकवाड यांनी लावलेल्या “प्रलंबित गुन्हा लपवला” या आरोपावरही प्रतिक्रिया दिली. छाननी प्रक्रियेदरम्यान गायकवाड यांनी कागदोपत्री पुरावे सादर केले होते, परंतु निवडणूक अधिकारी आणि न्यायालय दोघांनीही ते आरोप निराधार ठरवत बारसकर यांचे प्रतिज्ञापत्र वैध असल्याचे स्पष्ट केले.
शेवटी बोलताना बारसकर म्हणाले, मोहोळ शहर नेहमीच सत्याला साथ देत आले आहे. आज न्यायालयाने सत्याला मोहर दिली आहे. 3 डिसेंबरला मोहोळ शहर विकासाच्या विचाराला मतदान करेल आणि धनुष्यबाण विजयी होईलहा माझा ठाम विश्वास आहे.
0 Comments