महूद चौकातील अतिक्रमण हटविल्याने वाहतूक कोंडी टळणार
महूद (कटूसत्य वृत):- महूद येथील मुख्य चौकात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर अखेर उपाययोजना करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस प्रशासनाने मुख्य चौकातील अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा केला. या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी अंमलबजावणीत भेदभाव झाला असा आरोप काही ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.
महूद हे सांगोला तालुक्यातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून, येथे जत–इंदापूर राष्ट्रीय महामार्ग आणि पंढरपूर–मल्हारपेठ राज्य महामार्ग एकत्र येतात. या चौकात दररोज मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने आणि स्थानिक वाहतूक होत असल्याने गंभीर कोंडीची समस्या निर्माण झाली होती.
वाहनांच्या लांबच लांब रांगा, वारंवार होणारे अपघात, तसेच शालेय विद्यार्थी, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळपासून मोठा फौजफाटा तैनात करून अतिक्रमण हटविण्याची कारवाई** करण्यात आली.मुख्य चौक आणि परिसरातील वाहतुकीस अडथळा ठरणारे दुकानदारांचे स्टॉल, जाहिरातीचे बोर्ड आणि अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली. कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली.
कारवाईनंतर वाहतुकीसाठी रस्ता मोकळा झाल्याने ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाचे कौतुक केले. मात्र, काही नागरिकांनी पोलिसांनी भेदभाव केल्याचा आरोप केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी गोरगरिबांच्या दुकानांवर हातोडा चालवण्यात आला, तर रस्त्याच्या कडेला गटारावर बांधलेली धनदांडग्यांची अतिक्रमणे मात्र कायम ठेवण्यात आली. त्यामुळे ही कारवाई निवडक स्वरूपात झाल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.
महूदकरांनी आता ही मोहीम एकदाच न थांबता नियमितपणे सुरू ठेवावी, अशी मागणी केली आहे. तसेच वाहतुकीच्या सुलभतेसाठी चौकाचे रुंदीकरण, सिग्नल व्यवस्था आणि पार्किंग नियोजन करण्याची मागणीही स्थानिक युवक दिलीप केसकर, सागर साबळे, नवा सरतापे, नागेश थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या कारवाईनंतर महूद चौकातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटणार असल्याची शक्यता आहे. मात्र,अतिक्रमणावरची कारवाई सातत्याने व निष्पक्षपणे झाली**, तरच नागरिकांना दिलासा मिळेल, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.

0 Comments