Hot Posts

6/recent/ticker-posts

अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, '

 अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप,


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीने मंगळवारी धक्कादायक वळण घेतले. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) पक्षाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरवण्यात आला आहे.

या निर्णयामुळे अनगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी थिटे यांचा अर्ज रद्द करण्यामागे सूचकाची (Proposer) सही नसणे हे तांत्रिक कारण ग्राह्य धरले. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी उज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या आवश्यक कागदपत्रांमध्ये सूचकाची सही नव्हती, या मुद्द्याकडे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आणि अर्ज बाद झाला. यानंतर आता उज्वला थिटे यांनी प्रतिक्रिया दिली.

सोलापूरमधील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन पाटील यांचे गेल्या अनेक वर्षांपासून अनगर ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व आहे. अनगर ग्रामपंचायतीचे पहिल्यांदाच नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्याने राजन पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्याने अजित पवारांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी दिल्याने राजन पाटील यांना आव्हान दिलं होतं. उमेदवारी अर्ज भरता येऊ नये म्हणून राजन पाटील यांनी गुंडांची फौज उभी केली. नगरपरिषदेच्या कार्यालयात पोहोचू नये यासाठी संपूर्ण यंत्रणाही कामाला लावली, असा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केला होता. त्यानंतर सोमवारी पहाटे ५ वाजता पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज दाखल केला.

मात्र अनगरमध्ये कोणीही उमेदवारच उभा न राहिल्याने राजन पाटील यांच्या पॅनेलच्या १७ जागा बिनविरोध निवडून आल्या. तर नगराध्यक्षपदासाठी राजन पाटील यांची सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण कागदपत्रांच्या छाननीदरम्यान उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवला आणि प्राजक्ता पाटील यांचा विजय निश्चित झाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले की, "उज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नव्हती. नियमानुसार हा अर्ज अवैध ठरतो, त्यामुळे तो अर्ज बाद करण्यात आला."

या अनपेक्षित निर्णयावर उज्वला थिटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी न्यायावर विश्वास व्यक्त करत हा अर्ज नेमका कसा बाद झाला, यासंदर्भात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

"अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चार ते पाच दिवस संघर्ष करत होते. तेवढ्या संघर्षातून मी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुरुवातीला तर कागदपत्रे मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या. कागदपत्रे मी माझ्या वकिलाकडून तपासून घेतली होती. प्रत्येक कागदपत्रावर माझ्या मुलाची सही होती. काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता. तरी सुचकाची सही राहिलीच कशी? हे शक्यच नाही. माझा अर्ज कसा बाद झाला किंवा केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागणार आहे," उज्वला थिटे म्हणाल्या.

उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील आणि प्रशासनावर आरोप केले. उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचक म्हणून त्यांच्या मुलाची सही होती, ती निवडणूक अधिकाऱ्यांसमोर केली होती. तरीही सूचकाची सही नाही म्हणून अर्ज बाद कसा करण्यात आला? प्रशासनाने काही टेक्निक वापरून सही गायब केली का? याची चौकशी व्हायला व्हावी अशी मागणी उमेश पाटली यांनी केली.

Reactions

Post a Comment

0 Comments