Hot Posts

6/recent/ticker-posts

रविंद्र चव्हाणांच्या माध्यमातून भाजपा कार्यकर्त्याच्या घरी पैसे; निलेश राणेंची धाड

 रविंद्र चव्हाणांच्या माध्यमातून भाजपा कार्यकर्त्याच्या घरी पैसे; निलेश राणेंची धाड


सिंधुदुर्ग (वृत्त सेवा) :- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीतील शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या तिन्ही घटक पक्षांमध्येच काही ठिकाणी स्वतंत्र लढत होत आहे. सिंधुदुर्गातही शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे याठिकाणी मंत्री नितेश राणे विरुद्ध आमदार डॉ. निलेश राणे यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आमदार निलेश राणे यांनी कणकवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात करून भावाविरोधातच राण उठवले आहे. भावांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे कणकवलीचे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच निलेश राणे यांनी आज (26 नोव्हेंबर) मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर भाजपा पदाधिऱ्याच्या घरी धाड टाकली. यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले आहेत.
मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर निलेश राणे यांनी आपल्या आज काही कार्यकर्त्यांसह एका भाजपा पदाधिकाऱ्यांच्या घरात अचानक धाड टाकली. महत्त्वाचे म्हणजे निलेश राणे यांनी संपूर्ण कारवाई त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओच्या माध्यमातून लाइव्ह प्रसारित केली. तसेच निलेश राणे यांनी जाहिररित्या सांगितले की, भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम ठेवलेली आहे. निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रभावित करण्यासाठी काळा पैसा वापरण्याचा प्रकार सुरू आहे आणि त्याचाच हा पुरावा आहे, असा दावाही निलेश राणे यांनी केला. तसेच आपला मोबाइल कॅमेरा सुरू ठेवत भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरातील सर्व दृश्ये थेट प्रसारित केली, ज्यामध्ये भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशाची बॅग आढळून आली आहे.
निलेश राणे भाजपा पदाधिऱ्याच्या घरी धाड मारल्याची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी जमली. वातावरण तणावपूर्ण होत असल्याचे लक्षात येताच निलेश राणे यांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर काही वेळातच मालवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी संबंधित घराची पाहणी केली. तेव्हा निलेश राणे यांनी पोलिसांशी संवाद साधताना म्हटले की, निवडणुकांसाठी अजून सहा दिवस बाकी आहे. माझ्याकडे यादी आहे, परंतु आज भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरात 20 ते 25 लाख सापडले आहेत. रविंद्र चव्हाणांच्या माध्यमातून भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी पैसे आले आहेत. त्यामुळे तुम्ही या लोकांचा लवकरात लवकर बंदोबस्त करा किंवा कडक कारवाई करा, नाहीतर मी स्वत: यांचा बंदोबस्त करेल, असा इशारा देतानाच निलेश राणे यांनी अशाप्रकारे भाजपाला निवडणुका जिंकायच्या आहेत का? असा सवाल केला. तसेच हे सगळे लवकरात लवकर थांबवले पाहिजे, यासाठी योग्य ती कारवाई करा, अशी मागणी देखील त्यांनी केली. त्यानंतर पोलिसांकडून घरात सापडलेल्या पैशांचा पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
सिंधुदुर्गात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाऊबंदकीचं राजकारण पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी कणकवलीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून भाजपाचे जे आमदार आहेत, त्यांनी काय विकास केला? असा सवाल करत थेट नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच समीर नलावडे हे भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यांच्या घरात मुस्लीम मतदार काय करत आहेत? हा माझा निवडणूक आयोगाला प्रश्न होता. परंतु निवडणूक आयोगाचे उत्तर समीर नलावडे का देत आहेत? असा सवालही त्यांनी विचारला होता. यानंतर आता निलेश राणे यांनी भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली आहे, त्यामुळे सिंधुदुर्गात राजकीय वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments