२९ दूध संस्थांना अनुदानाचा अद्याप ठावठिकाणा नाही!
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-पंढरपूर तालुक्यातील तब्बल २९ दूध उत्पादक संस्थांना शासनाने जाहीर केलेले प्रतिलिटर ७ रुपयांचे दूध अनुदान वर्षभरापासून मिळालेले नाही, त्यामुळे दूध उत्पादक व संस्था चालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनांवरच भागवावे लागत असल्यामुळे संस्थांचे आर्थिक गणित बिघडू लागले आहे.
गतवर्षी दूधाचे दर कोसळल्यानंतर शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ५ ते ७ रुपये प्रतिलिटर अनुदान जाहीर करण्यात आले होते. सोलापूर जिल्ह्यातील काही संस्थांना हे अनुदान मिळाले असले तरी काही संस्थांची चौकशी लावून त्यांचे अनुदान प्रलंबित ठेवण्यात आले. चौकशी पूर्ण होऊन अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून, योग्य कागदपत्रे असलेल्या संस्थांना अनुदान देण्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात वर्षभरात काहीही बदल न झाल्याने परिस्थिती 'जैसे थे'च राहिली आहे.
दुग्धविकास विभागातील काही अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून विलंब केल्याचा आरोप दूध उत्पादकांकडून करण्यात येत आहे. आर्थिक देवघेवी, paperwork मधील हेतुपुरस्सर अडथळे आणि अधिकाऱ्यांचे टाळाटाळीचे उत्तर“आठ दिवसात होईल”,“पंधरा दिवसात होईल” इतकीच माहिती मिळत असल्याची तक्रार संस्थांनी केली आहे.
यापूर्वीही अशाच प्रकारचा अनुभव घेतल्यामुळे दूध उत्पादक हवालदिल झाले आहेत. सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण करूनही अनुदान रोखून धरले जात असल्याने संस्था चालक आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून अनुदान तत्काळ वितरित करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

0 Comments