सांगोला मतदारसंघातील ३० अंगणवाड्यांना स्मार्ट अंगणवाडी किटचा निधी
सांगोला (कटूसत्य वृत):- सांगोला विधानसभा मतदारसंघातील ३० अंगणवाडी केंद्रांना “स्मार्ट अंगणवाडी किट” खरेदीसाठी प्रति केंद्र १,६४,५६० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, यामुळे बालविकासाच्या क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे.
या योजनेअंतर्गत सांगोला तालुक्यातील निवडक ३० अंगणवाड्यांचे रूपांतर ‘आदर्श अंगणवाडी केंद्रांमध्ये’ करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित अंगणवाड्यांनाही निधी मिळणार असल्याची माहिती आमदार देशमुख यांनी दिली.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये आरोग्य, पोषण आहार आणि पूर्वप्राथमिक शिक्षण या मूलभूत सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. स्मार्ट किटच्या साहाय्याने मुलांना आनंददायी आणि आधुनिक वातावरणात शिक्षण देण्यात येईल.तसेच, किशोरवयीन मुली व महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम ही राबवले जाणार आहेत. यामुळे अंगणवाडी केवळ लहान मुलांचे केंद्र न राहता, महिला व किशोरींच्या प्रगतीचेही केंद्र ठरणार आहे.
या योजनेसाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी महिला व बालविकास मंत्री मा. अदिती तटकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे सांगोला मतदारसंघातील ३० अंगणवाड्यांना निधी मंजूर झाला आहे.
आमदार देशमुख म्हणाले,“या निधीमुळे सांगोला तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांचा दर्जा उंचावणार असून, मुलांच्या शिक्षण आणि आरोग्य विकासासाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.”या निर्णयामुळे सांगोला तालुक्यातील बालकांच्या सर्वांगीण विकासासोबतच महिला सक्षमीकरणालाही बळ मिळणार आहे. अंगणवाड्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन त्या “स्मार्ट आणि आदर्श” केंद्रांमध्ये परिवर्तित होतील.

0 Comments