विरोधकांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही- आ. सचिन कल्याणशेट्टी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- १७ वर्षे आमदारकी आणि मंत्रिपद स्वतःकडे असताना शहराचा विकास साधता आला नाही. आता आम्ही मंजूर केलेल्या पाणीपुरवठा योजनेचे श्रेय विरोधक घेत आहेत. मात्र, अक्कलकोटची जनता सर्व सत्य जाणून आहे आणि यंदाही त्यांना काहीच हाती लागणार नाही, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
अक्कलकोट शहरातील नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी तसेच विविध प्रभागातील नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की, मागील सहा ते सात वर्षात शहर आणि तालुक्यात झालेला विकास मागील ५० वर्षांतही झाला नव्हता. झालेल्या कामांमुळेच विरोधकांना पोटदुखी झाली आहे. आणि म्हणूनच आमची विकासकामेही त्यांनी केली असल्याचा खोटा दावा केला जात आहे.
ते म्हणाले की, विरोधक नुकतेच शिवसेनेत दाखल झाले असून त्यांना शहर आणि तालुक्याला मंजूर झालेल्या निधीचीही माहिती नाही. शहरासाठी मंजूर झालेला निधी तीन ते चार वर्षांपूर्वीचा असून सर्व कामे पाइपलाइनमध्ये आहेत. अनेक कामे पूर्णत्वास गेली आहेत. पाणीपुरवठा योजनेचे कामही वेगाने सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना शिंदे गटाचे नेते सर्व कामांचे श्रेय स्वतः घेत आहेत. मात्र वस्तुस्थिती जनतेला माहीत असल्याने अशा भूलथापांना जनता बळी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढील सहा महिन्यांत अक्कलकोटला दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या कामासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ७५ कोटींचा निधी विशेष बाब म्हणून मंजूर केल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी, महेश हिंडोळे, यशवंत धोंगडे, ननू कोरबू, बंटी राठोड, नविद डांगे, बाळा शिंदे, सुनील सिद्धे, शिवराज स्वामी, तम्मा शेळके, वरुण शेळके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
.png)
0 Comments