Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रशासकीय त्रासामुळे आत्महत्येचा प्रयत्न आणि अखेर मृत्यू; बार्शी तालुक्यात खळबळ

 प्रशासकीय त्रासामुळे आत्महत्येचा प्रयत्न आणि अखेर मृत्यू; बार्शी तालुक्यात खळबळ

बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश बाविस्कर यांनी वरिष्ठांकडून सतत होत असलेल्या मानसिक, प्रशासकीय आणि आर्थिक त्रासामुळे १९ नोव्हेंबर रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गंभीर अवस्थेत त्यांना बार्शीतील जगदाळेमामा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. तब्बल सहा दिवस उपचार सुरू राहिल्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने बार्शी तालुक्यात प्रशासनातील अंतर्गत दबाव आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मृत प्रकाश बाविस्कर यांची मुलगी दिव्या आणि मुलगा शिवम यांनी या मृत्यूला पूर्णपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरत विस्तार अधिकारी अक्षय शेंडगे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसेच कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, बाविस्कर पूर्वी पिंपळगाव (धस) येथे कार्यरत होते. मात्र, मागील दोन महिन्यांपासून विस्तार अधिकारी अक्षय शेंडगे हे त्यांना वारंवार कुर्डुवाडी येथे येण्यासाठी दबाव टाकत होते. तसेच त्यांनी बाविस्करांकडे ₹२ लाखांची आर्थिक मागणी केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. वडिलांनी त्यातील ₹५०,००० रुपये दिल्याचे दिव्या आणि शिवम यांनी सांगितले.
कुटुंबियांचे म्हणणे आहे की, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ हे देखील शेंडगे यांच्या माध्यमातून बाविस्करांकडे सातत्याने पैशांची मागणी करत होते. या सततच्या मानसिक दडपण, प्रशासकीय छळ आणि आर्थिक त्रासामुळेच त्यांच्या वडिलांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला, असा ठपका कुटुंबीयांनी ठेवला आहे.
या घटनेनंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेमक्या कोणत्या परिस्थितीत काम करावे लागत आहे, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनातील अंतर्गत भ्रष्टाचार आणि कर्मचारी छळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्मसीमेवर पोहोचला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments