राज्य मार्गांवर वृक्षलागवड; तीन महिन्यात लागवड व तीन वर्ष संगोपनाची अट
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माढा आणि सांगोला तालुक्यातील सहा राज्य मार्गालगत व्यापक प्रमाणात वृक्षलागवड करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठी निविदा जाहीर केली आहे. वाढते प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि बदलते वातावरण पाहता रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना वृक्षलागवड करून हिरवाई वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित होत असल्याने शासनाने हा उपक्रम गतीमान केला आहे. निविदेनुसार तीन महिन्यांत वृक्षलागवड आणि तीन वर्षांपर्यंत नियमित संगोपन करणे बंधनकारक राहणार आहे.
निविदेत विविध रस्त्यांसाठी करण्यात येणाऱ्या खर्चाचा समावेश असून पंढरपूर तालुक्यातील
खेड भाळवणी- बाजीराव विहीर - गादेगाव - कोर्टी - बोहाळी - खर्डी या १५ कि.मी. परिसरात वृक्षलागवडीसाठी ₹४०.२४ लाख,
मोडनिंब -करकंब- उंबरे रस्त्यासाठी ₹३८.९४ लाख,
सांगोला तालुक्यातील-लोटेवाडी – अचकदाणी – वाकी शिवणे – हलदहिवडी – शिरभावी – खर्डीरस्त्यासाठी ₹३८.९४ लाख,
लोटेवाडी- अचकदाणी- खर्डी - तावशी - एकलासपूर - नेपतगाव - ओझेवाडी रस्त्यासाठी ₹२०.१२ लाख,
तर-हिवरे-कोन्हेरी- पेनुर - येवती - मेंढापूर- भोसे - कुरोली -भाळवणी - मोहीम रस्त्यासाठी ₹१९.४७ लाख इतका खर्च अपेक्षित आहे.
सध्या अनेक रस्त्यांवर साईड पट्ट्या खराब झाल्या असून काही ठिकाणी शेतकऱ्यांचे अतिक्रमण असल्यामुळे बांधकाम विभागाला सुरुवातीला अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवावी लागणार आहे. बाजीराव विहीर ते गादेगाव रस्त्यालगत वृक्षमित्र दत्तात्रय बागल यांनी काही दिवसांपूर्वी स्वतः खड्डे तयार करून लागवडीची तयारी केली होती. मात्र बांधकाम विभागाकडून पुरेशी उत्सुकता न दाखवल्याने काम पुढे सरकले नाही आणि साफसफाईदरम्यान घेतलेले खड्डे पुन्हा बुजले.आता निविदा प्रसिद्ध झाल्याने संबंधित मार्गांवर मोठ्या प्रमाणात हिरवाई निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0 Comments