समर्थ बँकेवर RBI चा आघात; ठेवीदारांची दिवाळी अंधारात !
- अतिवृष्टीची झळ पुरेशी नव्हती, आता बँकही कोसळली
- समर्थ’ बँक असमर्थ? RBI च्या कारवाईने ठेवीदारांची झोप उडाली
- शेती गेली, आता पैसेही अडकले, शेतकरी-निवृत्तांना जबर फटका
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरसह राज्यातील 32 शाखा असलेल्या आणि 1 लाखांहून अधिक ठेवीदारांची गुंतवणूक असलेल्या *समर्थ सहकारी बँकेवर* रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अचानक निर्बंध घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या निर्बंधामुळे बँकेच्या व्यवहारांवर मोठा परिणाम झाला असून, ठेवीदारांमध्ये प्रचंड नाराजी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर आलेला हा धक्का अनेकांसाठी आर्थिक संकट ठरतो आहे.
आरबीआयचे निर्बंध नेमके काय आहेत?
रिझर्व्ह बँकेने बँकिंग नियमन अधिनियम 1949 च्या कलम 35(A) आणि 56 अंतर्गत समर्थ सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. या अंतर्गत:
बँक आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणतेही नवीन कर्ज देऊ शकणार नाही.
ठेवी स्वीकारता येणार नाहीत.
मालमत्ता विक्री वा हस्तांतर करता येणार नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत.
तथापि, डीआयसीजीसी (DICGC) योजनेनुसार ठेवीदारांना त्यांच्या खात्यातील रकमेवर पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळू शकते, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
बँकेसमोर गर्दी, ठेवीदारांची हतबलता
काल संध्याकाळी निर्बंधांची घोषणा झाल्यानंतर आज सकाळपासूनच बँकेच्या सर्व शाखांमध्ये ठेवीदारांची मोठी गर्दी झाली आहे. अनेक जण रांगेत उभे राहत आपली रक्कम मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, बँक कर्मचाऱ्यांकडून "सध्या कोणतीही रक्कम देता येणार नाही" असे स्पष्ट सांगितले जात असल्याने नागरिकांमध्ये निराशा आहे.
महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांचे डोळे पाणावले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे आणि वैद्यकीय, शैक्षणिक खर्चासाठी रक्कम ठेवणाऱ्यांचे हात-पाय गळाले आहेत. "उसाचे पैसे नुकतेच खात्यात आले होते, आता तेही अडकलेत" असे म्हणत एक शेतकरी भावनिक झाला.
बँकेचे अध्यक्ष अत्रे म्हणाले – "सर्वांचे पैसे सुरक्षित आहेत"
या प्रकरणावर *बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे* यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,
"गेल्या तीन महिन्यांत बँकेने चांगली आर्थिक प्रगती केली आहे. शेअर कॅपिटल दुप्पट झाली असून, लिक्विडीटी 60 कोटीने वाढली आहे. बँकेकडे सध्या सुमारे 70-80 कोटी रुपयांची ठेवी आहेत. आमच्यावर अचानक आलेली कारवाई आश्चर्यकारक आहे."
ते पुढे म्हणाले, "250 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळण्यासाठी बोलणी सुरू आहेत. त्यापैकी सव्वाशे कोटीची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या मार्गावर आहे. आम्ही आरबीआयकडे मेलद्वारे निवेदन पाठवले आहे की, सॅलरी, मेडिकल इमर्जन्सी आणि मुलांच्या शिक्षणासाठी किमान रक्कम काढण्याची मुभा देण्यात यावी."
ठेवीदारांची व्यथा – "लेखी हमी तरी द्या!"
बँकेसमोर गर्दी केलेल्या ठेवीदारांपैकी एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, "मुलीच्या नावावर 9.5 लाख रुपये आणि चालू खात्यात 80 हजार ठेवले आहेत. बँकेने निदान आम्हाला लेखी स्वरुपात आश्वासन तरी द्यावं की किती दिवसात पैसे परत करतील. पण तेही देत नाहीत."
किरण मोहिते, निवृत्त मुख्याध्यापिका, म्हणाल्या – "पेंशन वरच आमचा उदरनिर्वाह आहे. कालच मिस्टरांनी 40 हजार माझ्या खात्यात पाठवले. पण मी ते पैसे वापरू शकले नाही."
शेतकरी वर्गाचे दुहेरी नुकसान
या संकटात शेतकऱ्यांचे नुकसान अधिकच आहे. आधीच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, त्यातच उसाचे पैसे बँकेत जमा होताच अडकले. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. "शेती गेली, आणि बँकेत ठेवलेली आशा सुद्धा!" अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
बँकेच्या भविष्यासाठी गुंतवणूकदारांची तयारी
अत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणूकदार 250 कोटींपर्यंत गुंतवणुकीसाठी तयार आहेत. यातील एक मोठी रक्कम बँकेत येऊन पोहोचली असून, बँकेवरील निर्बंध लवकरच हटतील असा दावा त्यांनी केला आहे.
निष्कर्ष – ‘दिवाळी आधीचा अंधार’
दिवाळीच्या तोंडावर आलेल्या या आर्थिक संकटामुळे सोलापूर आणि आसपासच्या भागातील हजारो कुटुंबांवर अंधार पसरला आहे. आरबीआयने बँकेवरील निर्बंध किती काळ ठेवायचे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल, पण तोपर्यंत ठेवीदार, शेतकरी, निवृत्त नागरिक आणि सर्वसामान्य ग्राहक हवालदिल आहेत.
0 Comments