सोलापूर आयटीआयमध्ये अल्पमुदतीचे आधुनिक अभ्यासक्रम सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी उद्घाटन सोहळा
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- वाढती लोकसंख्या आणि त्यासोबत तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देण्याचे आव्हान पेलण्यासाठी सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये असलेल्या पायाभूत सुविधांचा पुरेपूर वापर करून अल्पमुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम अंगीकारणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राज्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (आयटीआय) नव्याने सुरू होणाऱ्या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते आभासी पद्धतीने मुंबईहून बोलत होते.
या वेळी पंतप्रधानांनी तरुणांमधील शिकण्याची उर्मी आणि वाढत्या औद्योगीकरणाची गरज यांचा ताळमेळ बसवण्यासाठी अल्पमुदतीचा अभ्यासक्रम हा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट केले. अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून केवळ रोजगार व शिक्षण हाच हेतू नसून, यापूर्वी घेतलेल्या शिक्षण व प्रशिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्वतःला सदैव काळाच्या पुढे ठेवण्याचेही हे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. एक रोजगारक्षम युवक हा समृद्धी आणि सामाजिक चेतनेचे वलय घेऊन समाजात वावरत असतो, आणि या तरुणाईच्या उर्जेला साथ देण्यासाठी शासन व प्रशासन एकदिलाने काम करत असून त्यांच्या प्रयत्नांचे मूर्त स्वरूप म्हणजेच हे नव्याने सुरू होणारे आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित अल्पमुदतीचे व्यवसाय आहेत, याचा तरुणांनी पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
सोलापूर येथील विजापूर रोडवरील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत या विशेष प्रसंगी शासनाच्या विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी सुवर्णकार सिद्धराम पोतदार यांच्या हस्ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सदर अभ्यास वर्गाचे फीत कापून औपचारिक उद्घाटन झाले. सिद्धराम पोतदार यांनी उपस्थितांना चौकसपणे शासकीय योजनांचा लाभ घेऊन समाजात आत्मविश्वासाने पुढे येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. एस. नंदी होते.
प्रत्यक्ष उद्घाटनाच्या कार्यक्रमात संस्थेचे प्राचार्य सुरेश भालचिम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्या तीन अल्पमुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये १) टू व्हीलर सर्विस असिस्टंट, २) सी.एन.सी. ऑपरेटर व्ही.एम.सी. आणि ३) सोलर पीव्ही इन्स्टॉलर – इलेक्ट्रिकल हे अभ्यासक्रम आहेत. आगामी काळात यामध्ये आणखी भर पडून एकूण बारा व्यवसाय अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. अत्यल्प प्रशिक्षण शुल्क आकारून सुरू झालेल्या या अभ्यासक्रमामध्ये आधुनिक यंत्रसामुग्री, कुशल व अनुभवी प्रशिक्षक वर्ग यांच्या मदतीने दर्जेदार प्रशिक्षण दिले जाणार असल्याने त्याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास संस्था व्यवस्थापन समिती सदस्य दशरथ वडतिले उपस्थित होते. त्यांनीही उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करताना अल्पावधीमध्ये राष्ट्राच्या उन्नतीसाठी जास्तीत जास्त युवक, युवतींनी हे तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण घेतले पाहिजे यावर भर दिला.
कार्यक्रमास जिल्हा कौशल्य रोजगार मार्गदर्शन अधिकारी हनुमंत नलावडे, किर्लोस्कर उद्योग समूहाच्या श्रीमती सायली मंत्री, थरमॅक्स इंजिनिअरिंग सोलापूरचे व्यवस्थापक किरण भिसे, अल्ट्राटेक सिमेंटचे एच.आर. मॅनेजर एस. एस. नंदी, स्वदर्श इंजिनिअरिंगचे व्यवस्थापक शंकर शिंदे, तसेच संस्थेतील वरिष्ठ गटनिदेशक सिद्राम गोलेकर, श्रीमती स्मिता शिंदे, श्रीमती निर्मला म्हेत्रे, अशोक मिरगणे, कार्यालयीन अधीक्षक प्रदीप दराडे, बालाजी माळी यांसह संस्थेतील निदेशक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबू आसरेडी व श्रीमती कांचन कुंभार यांनी केले. प्रास्ताविक उपप्राचार्य सूर्यकांत झणझणे यांनी केले, तर विजय भांगे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमास प्रवेश इच्छुक प्रशिक्षणार्थी, निवृत्त शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments