Hot Posts

6/recent/ticker-posts

खा. प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; ६५ मिमी पावसाची अट रद्द सरसकट पंचनामे होणार

 खा. प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; ६५ मिमी पावसाची अट रद्द  सरसकट पंचनामे होणार




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना अनेक मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागत होते. मात्र, प्रत्यक्षात ज्या भागात जास्त पाऊस झाला परंतु ६५ मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली अशा शेतकऱ्यांचे पंचनामे न होणे ही गंभीर बाब खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारसमोर ठळकपणे मांडली होती.

याबाबत दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन या अन्यायकारक अटीविषयी व इतर मागण्याविषयी सविस्तर निवेदन सादर केले होते. त्यांनी स्पष्ट मागणी केली होती की, ज्या मंडळांमध्ये पावसाची अधिकृत नोंद ६५ मिमीपेक्षा कमी आहे, परंतु प्रत्यक्षात अधिक पाऊस झाला आहे, अशा ठिकाणी ६५ मिमी पावसाची अट रद्द करून सरसकट पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.

या मागणीची मा. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेत ६५ मिमी पावसाची अट रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

खासदार शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेतला गेल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments