आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीची आरोग्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 13, 2025

आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीची आरोग्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा

 आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीची आरोग्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा




मुंबई, (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाची राज्याचे आरोग्यमंत्री मा. प्रकाश अबिटकर, आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक मा. कादंबरी बलकवडे, सहसंचालक (अ. तांत्रिक) मा. राजेंद्र भालेराव आणि राज्य समन्वयक स्वाती पाटील यांच्या सोबत सविस्तर बैठक पार पडली. या बैठकीत विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे कृती समितीने सांगितले.

बैठकीत आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी आशा व गटप्रवर्तकांना भाऊबीज भेट देण्याच्या प्रस्तावावर मंत्रिमंडळ पातळीवर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच, गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

आरोग्य आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्या दालनात झालेल्या चर्चेत मोबाईल रिचार्ज भत्ता ₹१०० वरून वाढवून ₹३०० करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नवीन मोबाईल देण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले.

सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्याबाबत मागील आदेश पुनर्विचारात घेण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. गटप्रवर्तकांसाठी एकसमान रंगाचा गणवेश देण्याबाबत चर्चा झाली. ऑनलाइन कामाबाबत “सक्ती नाही” असे स्पष्ट करण्यात आले असून, इतर विभागाकडून लावण्यात येणाऱ्या ऑनलाईन कामांविषयी संबंधित विभागांशी आयुक्त स्तरावर पत्रव्यवहार केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

तसेच, थकीत मानधन त्वरित देण्यासाठी आणि ‘लाडकी बहिण’ योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या आशांना मोबदला मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. बायोमेट्रिक हजेरीची सक्ती रद्द करण्यात आली असून, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर दररोज हजेरी लावण्याची जबाबदारी राहणार नाही, असा दिलासा कृती समितीला मिळाला.

आरोग्यमंत्री, प्रधान सचिव आणि आयुक्त यांच्या स्तरावर लवकरच सर्वसमावेशक बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन देण्यात आले. तसेच, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे मानधन पुढील तीन दिवसांत जमा होणार, असे सांगण्यात आले.
आरोग्य विभागात आशा व गटप्रवर्तकांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी आदेश काढले जाणार आहेत.

यानंतर कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

या शिष्टमंडळात कॉ. राजू देसले, भगवान देशमुख, पुष्पा पाटील, आरमायटी इराणी, ज्योती उराडे, सिद्धाराम उमराने, रुपाली दोरकर, शाहीन शेख, मंगल वावरगिरे आदी उपस्थित होते.
राज्यभरातून हजारो आशा व गटप्रवर्तकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. सोलापूर जिल्ह्यातील तब्बल दोन हजारांहून अधिक आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages