पाळलेला ‘गुण्या’ या रेड्याचा अविस्मरणीय व अनोखा सोहळा संपन्न
शेटफळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील शेटफळ या गावात गेल्या काही वर्षांपासून एक आगळावेगळा जीव ग्रामस्थांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता. श्री. संजय (गोटू) खडके यांनी पाळलेला ‘गुण्या’ हा रेडा फक्त जनावर नव्हता, तर कुटुंबातील एक लाडका सदस्य होता. गुण्याच्या जिव्हाळ्यामुळे आणि त्याच्या अनोख्या स्वभावामुळे तो गावातील प्रत्येकाच्या मनात घर करून गेला होता. मात्र, नियतीच्या क्रूर हाताने या रेड्याचे निधन झाले. त्याच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शेटफळमध्ये अविस्मरणीय व अनोखा सोहळा आयोजित करण्यात आला.
गुण्याची आठवण जिवंत ठेवणारा कार्यक्रम
गुण्या हा रेडा साधा प्राणी नव्हता. तो माणसाप्रमाणे वागत होता, आज्ञाधारक होता आणि आपल्या घरच्यांच्या हाकेला लगेच धावून जात असे. खडके कुटुंबीयांनी त्याच्यावर केलेले प्रेम व जिव्हाळा इतका दाट होता की गुण्याची अनुपस्थिती आजही सर्वांना जाणवते. हाच जिव्हाळा दाखवण्यासाठी आणि त्याच्या आठवणी कायम ठेवण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र आला.
खंडाळी येथील ह.भ.प. श्री. लोंढे महाराज यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. किर्तनात गावकऱ्यांना भक्तीबरोबरच निसर्ग, प्राणी आणि माणूस यांच्यातील नात्याचा संदेश मिळाला. त्यानंतर प्रसादरूपी जेवणाचे आयोजन करून उपस्थितांना सामूहिक जेवणाचा लाभ देण्यात आला.
गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या अनोख्या स्मरण सोहळ्याला गावातील शेकडो ग्रामस्थ, महिला वर्ग, मित्रपरिवार व ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. विशेष म्हणजे, असा कार्यक्रम गावात पहिल्यांदाच अनुभवायला मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये तो चर्चेचा विषय ठरला.
आयोजनात अनेकांचा सहभाग
या कार्यक्रमाचे आयोजन श्री. संजय (गोटू) खडके यांनी केले होते. तर यशस्वी नियोजनासाठी श्री. माळी सर, श्री. भगवान पुजारी, दिपक पुजारी, शिवाजी वागज, चेअरमन श्री. अर्जुन खडके, भारत (बापू) वागज तसेच गावातील अनेक ग्रामस्थ व मित्रमंडळींनी मनापासून परिश्रम घेतले. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा सोहळा यशस्वी ठरला.
गावासाठी स्मरणीय ठरलेला सोहळा
रेड्याच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शेटफळमध्ये झालेला हा आगळावेगळा सोहळा ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला. एका प्राण्याविषयी दाखवलेले अपार प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी तरळले. प्राणी आणि माणूस यांच्यातील नात्याचे हे अनोखे उदाहरण गावाच्या इतिहासात कायमचे कोरले गेले आहे.
गावातील अनेकांनी सांगितले की, “गुण्या” हा केवळ एक रेडा नव्हता; तो गावाचा सदस्य होता. त्याची आठवण पुढील पिढ्यांनाही राहील.
अशा प्रकारचा मानवी भावनांचा संगम व आपुलकीचा सोहळा गावकऱ्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
0 Comments