एक हात मदतीचा – आत्मविश्वास वाढवेल बळीराजाचा!” - पाटील
सोलापूर (कटूसत्य वृत्त):– मराठा सेवा संघाच्यावतीने पूरग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी “एक हात मदतीचा” या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांना भेट देऊन शालेय साहित्य, अंगवस्त्र व धान्यकिटचे वाटप करण्यात आले. शनिवार, ४ व रविवार, ५ रोजी शिवणी, तेलगाव (ता. उत्तर सोलापूर), एकरुक व डिकसळ (ता. मोहोळ) आणि अकोले (म.) (ता. दक्षिण सोलापूर) येथे ही मदत पोहचवण्यात आल्याची माहिती मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिली.
मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. पूर ओसरला असला तरी घराघरात गाळ, दुर्गंधी, पाण्याबरोबर वहात आलेले साप, उद्ध्वस्त झालेले संसार, वाहून गेलेली धान्य-उपयोगी साहित्य, तसेच शेतातील उभं पिकं नष्ट झालेलं हे वास्तव हृदयद्रावक आहे.
मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील बोलताना म्हणाले की, शेतकरी म्हणजेच जगाचा पोशिंदा. आज तो आस्मानी संकटाने हतबल झाला आहे. त्याने समाजावर केलेल्या उपकारांची परतफेड करण्याची वेळ सर्वांवर आली आहे. “एक हात मदतीचा” उपक्रमातून मिळालेलं पाठबळ बळीराजाचा आत्मविश्वास वाढवेल आणि तो पुन्हा नव्या उमेदीनं शेतात राबेल, असा विश्वासही व्यक्त करून
“एक हात मदतीचा – आत्मविश्वास वाढवेल बळीराजाचा!” असेही शेवटी पाटील म्हणाले.
पूरामुळे केवळ घरं-शेतीच नव्हे तर बांध, माती, नदिवरच्या मोटार-पाईप लाईन, वीज खांब-तारा, डीपी देखील वाहून गेले आहेत. शेतात झुडुपांचा खच पडला आहे. त्यामुळे बळीराजासमोर प्रश्न उभा राहिला आहे – संसार उभा करायचा की शेताला पुन्हा उभं करायचं?
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे तथा उद्योगपती दत्ता मामा मुळे यांनी सांगितलं की, “आज पहिली गरज आहे ती बळीराजाला या धक्क्यातून सावरण्याची आणि अभ्यासपूर्ण नियोजनबद्ध मदतीची. अन्नधान्यासोबत स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, वीज, शेताची मशागत, लेवलींग, जनावरांचा चारा या सुविधा तातडीने उपलब्ध करणे गरजेचे आहे. शासन, प्रशासन आणि समाज सर्वांनी एकत्र येऊन बळीराजाला हात द्यावा.”
यावेळी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, उद्योगपती दत्ता मामा मुळे, जिल्हाध्यक्ष जे.के. देशमुख, आर.पी. पाटील, सुर्यकांत पाटील, सदाशिव पवार, लक्ष्मण महाडिक, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा उज्वला साळुंखे, जाधव, लता ढेरे व पदाधिकारी व नुकसान ग्रस्त शेतकरी वाटपाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments