पूरग्रस्तांसाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा मदतीचा हात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरादारं, शेती, जनावरे, रस्ते, पूल यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हजारो कुटुंबे उघड्यावर आली आहेत. या संकटाच्या काळात शासनासोबत अनेक सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि शासकीय कर्मचारी वर्ग पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जिल्हा परिषद कर्म. सहकारी पत संस्था नियमित क्र. १, सोलापूर यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आयोजित कार्यक्रमात या संस्थेतर्फे रुपये १ लाख ११ हजारांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. संस्थेचे चेअरमन डॉ. एस. पी. माने यांनी हा धनादेश सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अक्षय पात्रा एनजीओला प्रदान केला.
या वेळी तज्ञ संचालक श्रीशैल देशमुख, संचालक विशाल घोगरे, चेतन वाघमारे, श्रीधर कलशेट्टी, शिवाजी राठोड, शिवानंद म्हमाने, रोहित घुले, तजमूल मुत्वल्ली, सौ. एम. एस. शिंदे, सभासद भीमाशंकर वाले तसेच सचिव दत्तात्रय देशपांडे हे मान्यवर उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संस्थेच्या या पुढाकाराचे मनापासून कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “पूरग्रस्त कुटुंबांसाठी अन्नधान्य, स्वच्छ पाणी, तात्पुरता निवारा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे सध्या प्राथमिक आव्हान आहे. या कठीण परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे.”
संस्थेचे चेअरमन डॉ. माने यांनी यावेळी सांगितले की, “पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमच्या संस्थेतर्फे दिला जाणारा हा निधी केवळ आर्थिक मदत नाही, तर सहानुभूती व सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे. पूरग्रस्त बांधवांच्या वेदना कमी व्हाव्यात यासाठी ही मदत उपयुक्त ठरेल. भविष्यात देखील अशा सामाजिक उपक्रमांना आमचा संस्थेचा पूर्ण पाठिंबा असेल.”
.png)
0 Comments