Hot Posts

6/recent/ticker-posts

झेडपी १२ हजार पूरग्रस्तांना देणार आठवडाभराचे रेशन

 झेडपी १२ हजार पूरग्रस्तांना देणार आठवडाभराचे रेशन

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-  अतिवृष्टी व त्यानंतर निर्माण झालेल्या महापुराने खचलेल्या नागरिकांसाठी सोलापूर जिल्हा परिषदेने मदतीचा हात पुढे केला आहे. शिक्षकांनी दिलेल्या सुमारे एक कोटी २० लाख रुपयांच्या देणगीतून पूरग्रस्तांसाठी बाराशे रुपयांचे आठवडाभर पुरेल इतके रेशन किट देण्यात येणार आहे. याचा शुभारंभ दक्षिण सोलापूर तालुक्यातून करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर जिल्ह्यात व शेजारच्या मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने सोलापूर जिल्ह्याला पुराचा तडाखा कमीत कमी बसला. यात सर्वाधिक नुकसान माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात झाले. या महापुराने घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले तर अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेली. नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याबरोबरच अन्नधान्याचेही नुकसान झाले. एकूणच या महापुराने माणसांचे जगणेच हरवून गेले आहे. 

महापुरातील या लोकांच्या आरोग्य व स्वच्छतेचीही जिल्हा परिषदेने काळजी घेतली असून आता त्यांना जेवणासाठी व दररोजच्या उदरनिर्वाहासाठी लागणारे साहित्यही देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांनी सुमारे एक कोटी २० लाखांचा निधी पूरग्रस्तांसाठी जिल्हा परिषदेकडे जमा केला आहे. हा निधी अक्षय

पात्रा या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडे वर्ग केला असून या निधीतून नागरिकांना दररोज लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंचे किट देण्यात येणार आहे. प्रतिकुटुंब बाराशे रुपयांच्या या किटमध्ये विविध डाळी, रवा, साखर, सावण टुथपेस्ट, बिस्किटे, तेल, गहू, ज्वारी आदी साहित्यांचा समावेश आहे. सुमारे १२ हजार किट तयार करण्यात येत असून जसजसे कीट तयार होतील तसतसे त्याचे वाटप केले जाणार आहे. पूरग्रस्त प्रत्येक गावातील नागरिकांना हे किट मिळेल, याची दक्षता घेण्यात आली आहे. कोणीही या किटपासून वंचित राहणार नाही, याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

या महापुराने २४७ शाळा, २८४ अंगणवाडया, ५३ ग्रामपंचायत कार्यालये, २४ आरोग्य केंद्रे, ३६ पाणीपुरवठा योजना ९३ स्मशानभूमींना झळ बसली असून जिल्हा परिषदेच्या या मालमत्तांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जवळजवळ ७९६ रस्ते खराब झाले आहेत. शाळा, अंगणवाड्या दुरुस्तीबरोबरच रस्ते दुरुस्तीचेही काम हाती घेतले असल्याचे जंगम यांनी सांगितले.


चौकट 

सात हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

महापुराने शाळा, अंगणवाड्यांबरोबरच त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही फटका बसला आहे. सुमारे सात हजार विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य मिजले आहे तर काही विद्याथ्र्यांचे पाण्यात वाहून गेले आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, कंपास, बॅग व अन्य शालेय साहित्य देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी विशेष मोहीम राबवून सर्व विद्यार्थ्यांना दप्तर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कुलदीप जंगम यांनी सांगितले.


चौकट 

६५ गावांतील जनजीवन सुरळीत

पूस्त ८८ गावांपैकी ६५ गावांमध्ये स्वच्छतेचे काम पूर्ण झाले असून तेथील नागरिकांना आरोग्य व पिण्याच्या शुध्द पाण्याची उपलब्धता करण्यात आली आहे. उर्वरित गावातील स्वच्छता मोहीमही अंतिम टप्प्यात आहे. येत्या एक-दोन दिवसात तेही काम पूर्णत्वास येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले.


Reactions

Post a Comment

0 Comments