Hot Posts

6/recent/ticker-posts

बार्शी नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव

बार्शी नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव

बार्शी  (कटूसत्य वृत्त):-  आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी बार्शी नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. राज्य शासनाच्या नगर परिषद आरक्षण सोडत जाहीर झालेल्या या निर्णयानंतर अनेक इच्छुकांचे स्वप्न भंग झाले आहे.


या निर्णयामुळे बार्शी नगरपरिषदेवर एक अपवाद वगळता तब्बल २५ ते ३० वर्षांनी पाच वर्षांकरीता महिला नेतृत्व राज्य करणार आहे. यापूर्वी बार्शी नगरपरिषदेवर माजी आमदार व माजी नगराध्यक्ष प्रभाताई झाडबुके यांनी सलग २५ वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम करताना एक आदर्श निर्माण केलेला आहे. त्या पदाला माजी नगराध्यक्ष प्रभाताई झाडबुके यांच्या इतकाच न्याय देण्याचा, तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्व प्रमाणे त्यांचा आदर्श घेऊन, नगरपरिषदेचा कारभार नवीन महिला नेतृत्वाने करावा, अशी बार्शीकरांची अपेक्षा राहील. माजी नगराध्यक्ष प्रभाताई झाडबुके यांच्या कारकिर्दीनंतर बार्शी नगर परिषदेवर अनेक सत्तांतरे होऊन नगराध्यक्ष म्हणून स्व. श्रीकांत पिसे, विश्वास बारबोले, राजेंद्र राऊत, स्व. सरलाताई कांबळे, स्व. हेमंत सोनवणे, योगेश सोपल, रमेश पाटील, दगडू मांगडे, गणेश जाधव व महिला नगराध्यक्ष म्हणून मंगल शेळवणे, अॅड. आसिफ तांबोळी यांनी काम पाहिले आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी आता आमदार दिलीप सोपल व माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांचा गट आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाकडून हालचालींना वेग येणार आहे. दोन्ही गटाकडून शहरातील राजकीय समीकरणांचा अंदाज घेऊन, शहरातील जातीय समीकरणे, बार्शी शहरातील पै-पाहुण्यांचे राजकारण, गल्ली-बोळातील कार्यकर्त्यांचे गट-तट, शह- कटशाह, स्थानिक नेतृत्व, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करूनच आपल्या राजकीय अनुभवातून दोन्ही गट सक्षम असा सर्व समावेशक उमेदवार निश्चित करतील असे वाटते.


मागील नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष अॅड. आसिफ तांबोळी यांची एक महिना आधीच उमेदवारी जाहीर करून यशस्वी मास्टर स्ट्रोक खेळून नगरपरिषदेवर सत्ता मिळवली होती. याउलट आमदार दिलीप सोपल यांच्या गटाने उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी उमेदवार निश्चित केल्याने पराभवाला सामोरे जावे लागले होते.


नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करताना आमदार दिलीप सोपल हे मागील चूक पुन्हा करणार ? आणि माजी आमदार राजेंद्र राऊत हे मागील वेळे प्रमाणेच आधी उमेदवार जाहीर करून मास्टर स्ट्रोक खेळणार का? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments