Hot Posts

6/recent/ticker-posts

अक्कलकोट नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी

 अक्कलकोट नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):-  अक्कलकोट नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद खुल्या गटासाठी जाहीर झाला आहे. तालुक्यातल जबरदस्त राजकीय संघर्ष पहायला मिळणार आहे. तब्बल चार वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.


एकेकाळी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची मजबुत सत्ता असताना एकमेव अक्कलकोटचे नगराध्यक्षपद पश्चिम महाराष्ट्रात भाजपकडे होता. नगरपालिका निवडणुका होणार म्हणून चार वर्षापासून इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. तालुक्यावर भाजपाचे वर्चस्व आहे, तालुक्यात अक्कलकोट, मैंदर्गी आणि दुधनी असे तीन नगरपरिषद आहेत. अक्कलकोट आणि दुधनी नगराध्यक्षपद भाजपाकडे होते, तर मैंदर्गी नगराध्यक्षपद पक्षविरहित आघाडीकडे होते. अक्कलकोट नगर परिषदेसाठी यंदा कमालीची चुरस आहे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी हे प्रमुख दावेदार आहेत. नगरपरिषदेवर प्रशासक असताना देखील मिलन कल्याणशेट्टी हेच 'अघोषित' प्रमुख होते.


प्रत्येक धार्मिक उत्सवात त्यांचेच भावी नगराध्यक्ष असे डिजिटल बॅनर झळकले होते मिरवणुकांच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या घोषणा युवक देत होते. भाजपमध्ये माजी उपनगराध्यक्ष आणि नगरपरिषद पक्षनेते महेश हिंडोळे यांचेदेखील नाव चर्चेत आहे. तसेच राजकारणापासून अलिप्त असलेले माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी यांचेही नाव चर्चेत आहे. ते पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा भाजपचे नगराध्यक्ष होते. ते तत्कालीन नगराध्यक्ष कै. रेवणसिद्ध खेडगी यांचे काका होते. त्यांचे दुसरे काका कै. मल्लिकार्जुन खेडगी उपनगराध्यक्ष होते त्यांची आई शोभा खेडगी या नगराध्यक्ष होत्या तर वडील कै. शिवशरण खेडगी हे नगरसेवक होते. हे सर्वजण भाजपाचे होते. नगरपरिषदेत बरीच वर्षे काँग्रेस सत्ता होती कॉंग्रेसकडून काही काळासाठी नगराध्यक्ष असलेले जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी हे देखील इच्छुक आहेत. त्यांचे वडील कै. मुस्तफा बळोरगी देखील नगराध्यक्ष होते. काँग्रेसमधून

माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडादेखील इच्छुक आहेत.


दोन्ही पक्षात इच्छुकांची यादी मोठी आहे. आमदार कल्याणशेट्टी यांच्या तालुक्यात एकहाती सत्ता आहे. कॉंग्रेसचे एकनिष्ठ तथा माजी गृहाराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे सत्ताधारी शिवसेनेत दाखल झाले आहेत. भाजप आणि शिवसेना युती होणार का? यावर प्रश्नचिन्ह आहे, मात्र राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि

आरपीआय (आठवले गट) भाजपा सोबतच राहणार हे निश्चित आहे. शहर आणि तालुक्य भाजपा शक्तीशाली पक्ष आहे. पहिल्यांदाच कॉंग्रेस हे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हैत्रे यांच्याशिवाय मैदानात असल्याने कॉंग्रेसला ही निवडणूक अवघड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आघाडीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण याबद्दल देखील कमालीच्या उत्सुकता निर्माण झाली आहे..


चौकट 

बिच मे मेरा चांद - भाजपाकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार लिंगायत समाजाचा

असण्याची शक्यता आहे. शिवसेना देखील मैदानात उतरली तर तो उमेदवार लिंगायत

असणार की बहूजन याची चर्चा आहे. काँग्रेसकडून लिंगायत समाजाच्या उमेदवार डॉ.

सुवर्णा मलगोंडा असतील का? अशपाक बळोरगी यांनी यापूर्वी भाजप आणि शिवसेना

या दोन हिंदुत्ववादी पक्षात लढत झाली तर धर्मनिरपेक्ष असणाऱ्या काँग्रेसला यशाची आशा आहे असे गणित मांडले होते. भाजपा आणि शिवसेना या युतीतच लढत झाली तर बीच मे मेरा चांद म्हणून अशपाक बळोरगी संधीची वाट पाहत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments