पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी निघाल्याने पुन्हा एकदा शहरात महिलाराज येणार हे स्पष्ट झाले आहे. सोमवारी आरक्षणाची सोडत जाहीर होताच थेट जनतेतून निवड होणाऱ्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या मातब्बर मंडळींसह समर्थकांनी आनंद व्यक्त करीत सोशल मिडीयावरून वातावरण निर्मिती करण्यास सुरूवात केली.
पंढरपुरात पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार अशी पारंपारिक लढत ठरलेली असते. गतवेळी नगराध्यक्षपद पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी निघाले होते. त्यावेळेस सत्ताधारी पांडुरंग परिवाराने साधना नागेश भोसले यांना, तर विरोधी विठ्ठल परिवाराने संतोष नेहतराव यांना उमेदवारी दिली होती. या लढतीत भोसले यांनी बाजी मारली. याचवेळी पंढरपूर नगरीचे सर्वाधिक काळ नगराध्यक्षपद भूषविण्याचे 'रेकॉर्ड' नावावर केले.
विधानसभा निवडणुकींपासून पंढरपूरच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी होऊन नवीन मातब्बर गटांचा उदय झाला आहे. पंढरपूरच्या राजकारणात पांडुरंग परिवाराकडे आमदारकी राहिलेली नाही, तर दुसरीकडे विरोधक विठ्ठल परिवारात आमदार अभिजीत पाटील यांच्या रूपाने नवे आणि खमके नेतृत्व उदयास आले आहे. त्यांना आमदार राजू खरे यांचीही भक्कम साथ राहणार हे स्पष्ट आहे. या दोन्ही आमदारांनी सहा महिन्यांपूर्वीच नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
परिचारक गट प्रणित पांडुरंग परिवाराकडून माजी उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांचे नांव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सर्वाधिक चर्चेत होते. महिला आरक्षणामुळे आता त्यांच्या पत्नी वैशाली वाळूजकर यांचे नांव आणले जात आहे. तसेच माजी नगरसेवक गणेश अधटराव यांच्या पत्नी स्मिता अधटराव यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.
विरोधी आघाडीकडून माजी नगराध्यक्षा साधना भोसले या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून भोसले गट हा परिचारक गटापासून दुरावला आहे.
याचवेळी सर्व विरोधकांना एकत्र करून आगामी निवडणूक लढण्याचे ध्येय भोसले यांनी ठेवले आहे. तसेच 'मनसे' नेते दिलीप धोत्रे यांनी गेल्या पाच वर्षांपासून नगरपरिषदेची निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. सातत्याने त्यांनी विरोधकांची एकजूट ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत. आता ते पत्नी माधुरी धोत्रे यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरविणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबरोबरच इतर स्थानिक गट-ग निवडणुकीच्या मैदानात स्वतंत्रपणे उतरणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील घटकपक्ष, सामाजिक संघटना कोणती भूमिका घेतात ? कोणत्या आघाड्या उदयास येतात ? यावरही बरेच काही अवलंबून आहे.
चौकट
डॉ. प्रणिता भालके यांच्यासाठी समर्थक आग्रही
पंढरपूर विधानसभेच्या गत दोन्हीही निवडणुकींमध्ये सर्वाधिक चर्चेचा चेहरा बनलेल्या कै.आ.भारत भालके यांच्या स्नुषा आणि भगीरथ भालके यांच्या पत्नी डॉ. प्रणिता भालके यांचे नांव आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून घेतले जात आहे. सोमवारी दिवसभर भालके समर्थक सोशल मिडीयावर तशा पोस्टचा पाऊस पाडत होते. डॉ. भालके यांनी आपला जनसंपर्क कायम ठेवला आहे. अनेक वर्षांपासून त्या पंढरपूरच्या मतदार आहेत. त्यामुळे त्यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी पुढे आले तर ही निवडणूक गाजणार हे निश्चित आहे.
0 Comments