भाजपाने हुल्लडबाजी थांबवून जनहिताच्या प्रश्नांवर बोलावे; अन्यथा ‘भाजपा कार्यालयाला टाळे लावा आंदोलन’
– ॲड. सुरेश गायकवाड यांचा इशारा
सोलापूर (कटूसत्य वृत्त) – “सोलापूरकरांनी भाजपाला दिलेल्या अफाट पाठिंब्याचा विसर पडून सत्ताधारी मस्तावले आहेत. आता हुल्लडबाजी थांबवून जनहिताच्या प्रश्नांवर बोला, अन्यथा आम्हाला ‘भाजपा कार्यालयाला टाळे लावा आंदोलन’ करावं लागेल,” असा इशारा प्रबोधन सेनेचे अध्यक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे ॲड. सुरेश गायकवाड (बापू) यांनी दिला आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात भाजपाला मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळाला. परंतु सत्तेवर आल्यानंतर या पक्षातील नेते व कार्यकर्त्यांमध्ये अहंकार आणि पक्षफोडीची प्रवृत्ती वाढली असल्याचे गायकवाड यांनी म्हटलं आहे. “दीपावलीच्या काळात सोलापूरकरांनी पाहिलं, जनहिताच्या प्रश्नांवर न बोलता, स्वतःच्या पक्षप्रवेशावरून भाजपातील गट एकमेकांवर आंदोलनं करत कपडे फाडत आहेत. ही दुर्दैवाची बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे त्रस्त शेतकरी, अनुदानासाठी ओरडणारे शेतकरी, नदीकाठच्या गावांतील पूरग्रस्त, शहरातील पाणीपुरवठ्याची अनियमितता, रस्त्यांची दुरवस्था, वाढलेलं प्रदूषण, बेरोजगारी, तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांच्या अडचणी हे गंभीर प्रश्न कायम आहेत. “जनतेचे हे प्रश्न सोडविण्याऐवजी भाजपाचे नेते राजकीय कुरघोडीत व्यस्त आहेत. जनता व्हेंटिलेटरवर असताना हे सत्ताधारी मात्र फुशारक्या मारण्यात मग्न आहेत,” अशी टीका गायकवाड यांनी केली.
त्यांनी पुढे म्हटलं की, “सोलापूर जिल्ह्यातील ११ पैकी ६ आमदार सत्ताधारी आहेत. पण त्यांनी जनतेला गृहीत धरून विकासाच्या गप्पा मारत जनतेची थट्टा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असताना ही मंडळी जनहिताऐवजी स्वार्थी राजकारण करत आहेत. जनतेला या दिशाहीन राजकारणाचा आता कंटाळा आला आहे.”
यावेळी अक्कलकोट रोड जनहित समिती, प्रबोधन सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), तसेच सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ९ व १२ यांच्या वतीने हा इशारा देण्यात आला.शेवटी ॲड. सुरेश ‘बापू’ गायकवाड म्हणाले, “भाजपाने अजूनही शहाणपणाचे औषध घेतले नाही तर ‘भाजपा कार्यालयाला टाळे लावा आंदोलन’ छेडल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.”

0 Comments