मोहोळ नारीशक्ती प्रतिष्ठानचा हृदयस्पर्शी उपक्रम — पूरग्रस्त बहिणींना ‘भाऊबीज’ साडी व दिवाळी किटचे वाटप
“एक साडी ही मदत नव्हे, आमचं कर्तव्य आहे” — सीमा पाटील
शिरापूर / नरखेड (कटूसत्य):- मोहोळ तालुक्यातील सीना व भोगावती नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक ग्रामस्थांचे संसार उद्ध्वस्त झाले. या भीषण परिस्थितीत दिवाळीचा आनंद हरवला होता. परंतु, महिलांनी महिलांसाठी पुढाकार घेत — मोहोळ नारीशक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूरग्रस्त भगिनींना ‘भाऊबीज’ स्वरूपात साडी व दिवाळी किट देऊन माणुसकीचा दीप प्रज्वलित केला.
नारीशक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका सीमा पाटील यांनी सांगितले की, “आम्ही उद्योगपती नाही, पण आमच्याकडे माणुसकीची संपत्ती आहे. एक साडी ही मदत नाही, तर आमचं सामाजिक कर्तव्य आहे. 2000 महिलांकडून साड्या गोळा करून त्या 2000 पूरग्रस्त महिलांपर्यंत पोहोचवल्या — हाच आमचा दिवाळी साजरा करण्याचा मार्ग होता.”
या उपक्रमात नाशिक, धुळे, पुणे, पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील विविध गावांतील महिलांनी साड्यांचे योगदान दिले. मलिकपेठ, नरखेड, भोयरे, एकुरके, वाळुज, देगाव, डिकसळ, आष्ट, शिरापूर, रामहिंगणी, नांदगाव, मुंडेवाडी या १३ गावांतील पूरग्रस्त महिलांना साडी–चोळी, दिवाळी किट, लहान मुलांना मिठाई व फटाके देऊन आनंदाचा क्षण दिला गेला. प्रत्येक ग्रामपंचायतीला आकाशकंदीलही भेट देण्यात आला.
या भेटीदरम्यान महिलांशी संवाद साधताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. घरं, शेती, जनावरे गमावलेल्या महिलांनी नारीशक्तीच्या या भावनिक आधाराला प्रतिसाद देत “दिवाळी पुन्हा उजळली” अशी भावना व्यक्त केली. अनेक गावांमध्ये अजूनही महापुराचे सावट जाणवत असून कुठेही दिवे, रांगोळ्या किंवा उत्सवी वातावरण नव्हते, हे दृश्य हृदय हेलावून टाकणारे होते.
या उपक्रमात दीपाली साठे, प्रज्ञा माळी, डॉ. अश्विनी माने, डॉ. स्नेहल गायकवाड, डॉ. वर्षा थोरात, डॉ. शीतल होळकर, प्रा. सुप्रिया देशमुख, adv. सुचिता वनकळसे, शुभांगी शेंडे, कविता हावळे, दुर्गा हंचे, स्वाती थिटे, वंदना चव्हाण, भाग्यश्री अबुज आदी अनेक महिलांनी परिश्रम घेतले.
१५०० पूरग्रस्त कुटुंबांना दिलेल्या दिवाळी किटमध्ये —
एक/दोन साड्या, साबण, उटणे, पणती, मिठाई, सॅनिटरी नॅपकिन, तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी आकाशकंदील अशा आवश्यक वस्तूंचा समावेश होता.

0 Comments