'डीजेमुक्ती'नंतर सोलापूर शहर आता 'भोंगेमुक्त'!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सण-उत्सवांचे शहर अशी ओळख असलेल्या सोलापूरने पुन्हा एकदा आदर्श घालून दिला आहे. यंदा शहरात पहिल्यांदाच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव 'डीजेमुक्त' पार पडले. आता सोलापूर शहरातील ८९३ धार्मिक स्थळांपैकी कायमस्वरूपी भोंगे लावणाऱ्या २८९ स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. पोलिसांच्या आवाहनानंतर धार्मिक स्थळांवरील भोंगे, लाउडस्पीकर सर्वांनी स्वत:हून काढल्याने शहर 'भोंगेमुक्त'ही झाले आहे.
'सकाळ'च्या पुढाकारातून 'डीजेमुक्त सोलापूर कृती समिती'ची स्थापना झाली. त्या समितीच्या माध्यमातून डीजेविरोधात व्यापक जनआंदोलन उभारले. यात ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स, वकिलांसह विविध सामाजिक संस्था, संघटना सहभागी झाल्या. या लढ्याला गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह अन्य मिरवणुकांमध्ये यश आले आणि सोलापूर 'डीजेमुक्ती' झाले. त्यानंतर आता सोलापूर 'भोंगेमुक्त'ही झाले आहे. दरम्यान, ध्वनिप्रदूषण कायद्यातील तरतुदीप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांवरील स्पीकरसाठी आवाजाची मर्यादा घालून दिली आहे. मंदिर, मशिदींसह अन्य धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा इतरांना त्रास होऊ नये, यादृष्टीने सोलापूर शहर पोलिसांनी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ट्रस्टी, मौलवी, शहर काझी यांच्यासमवेत बैठका घेतल्या. त्यावेळी सर्वांनी सकारात्मकता दर्शवत सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, शहरात शांतता राहावी म्हणून स्वत:हून भोंगे काढून घेतले.
धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात पोलिस आयुक्तालयात आयोजित बैठकीत पोलिस आयुक्त म्हणाले, 'साईज डज नॉट मॅटर, नॉईस लिमिट इज मोस्ट इंपोर्टेंट' या पार्श्वभूमीवर आवाजाची मर्यादा पाळून धार्मिक स्थळांवर स्पीकर लावण्यासाठी आता पोलिसांकडून तीन महिन्यांचा परवाना दिला जाणार आहे. पण, आतील बाजूला स्पीकर लावण्यास पोलिसांच्या परवानगीची गरज नाही, असेही पोलिस आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.भोंगे काढलेली धार्मिक स्थळे- मशीद, मदरसा, दर्गा १९२,मंदिरे ७९,चर्च १०,बौद्ध विहार ८,एकूण २८९
वाहनचालकांनो, आता वाहतूक नियम पाळाच नाहीतर...
शहरातील मिरवणुकांमधील 'डीजे' आणि आता धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा प्रश्न पोलिसांनी सोडविले आहेत. या पुढील टप्पा अपघात कमी करण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लावण्याचा असणार आहे. त्यासाठी आठवड्यातून तीन दिवस शहरातील विविध भागात नाकाबंदी लावली जाणार आहे. याशिवाय शहरातील वेगवेगळ्या चौकांमध्ये ट्रीपल सीट, विरुद्ध दिशेने वाहने चालविणे, नो पार्किंगमध्ये वाहन लावणे, मॉडिफाईड सायलेन्सर, मोबाईल टॉकिंग, सिग्नल जम्पिंग, मद्यपान करून वाहने चालविणे, लायसन्सविना वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिस कारवाई करणार आहेत. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त गौहर हसन यांनी त्याचे नियोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व वाहनधारकांना आता लायसन्स व गाडीची कागदपत्रे सोबत बाळगावी लागणार आहेत.
सोलापूरकरांमुळे शहर डीजेमुक्त झाले. आताही सर्वांच्या सहकार्यामुळे धार्मिक स्थळांवरील भोंगे देखील काढण्यात आले. आपल्या कृत्याचा इतरांना त्रास होणार नाही, याची सर्वांनी खबरदारी घेतल्यास पोलिसांना कारवाईची गरज पडणार नाही. पोलिसांच्या आवाहनानंतर सर्व मंदिर, मशिदी, चर्च, बौद्ध विहारांवरील भोंगे, लाउडस्पीकर काढून घेतल्याबद्दल सर्वांचे आभार. पोलिसांनी जो नियम केला तो सर्वांसाठीच लागू राहील, त्यात कोणताही दुजाभाव दिसणार नाही.
0 Comments