सहकार महर्षी साखर कारखान्यावतीने कामगारांना दिपावली सणासाठी बोनसचे वाटप.
अकलूज (कटूसत्य वृत्त):- शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यातील कामगारांना दिपावली सणासाठी १०% प्रमाणे बोनस वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम कारखान्याच्या संचालिका कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते- पाटील यांचे शुभहस्ते व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटीचे संचालक चि.सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स्मृतिभवन येथे संपन्न झाला.
सहकार महर्षि कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील (माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) तसेच कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना कर्मचारी यांचे करिता विविध उपक्रम व आरोग्य सेवा योजना राबविल्या जातात.त्याच अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमामध्ये कारखान्याचे एकुण १९ विविध विभागाकडील जेष्ट कर्मचारी यांना बोनस पत्र देण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरवातीस कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षि कै.शंकरराव मोहिते-पाटील व आक्कासाहेब यांचे प्रतिमेचे पूजन कारखान्याचे जेष्ट कामगार विश्वास कोरटकर यांचे शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासाठी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र केरबा चौगुले यांनी केले त्यामध्ये त्यांनी साखर उद्योग व कामगार यांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी कामगार संचालक रणजित रणनवरे यांनी कारखाना व्यवस्थापन कामगारांना कायम स्वरूपी वेळेत पगार तसेच बोनस देत असून कामगारांसाठी सेवा सुविधा देऊन विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगून कामगार व त्यांचे कुटुंबियांचे हित जोपासले जात आहे. त्याबद्दल सर्वांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. व्यवस्थापनाने दिलेल्या जबाबदा-या कर्मचारी पार पाडतील अशी ग्वाही दिली.कारखान्याने कामगारांना १०% प्रमाणे बोनस दिल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याकार्यक्रमा करीता कारखान्याचे सेक्रेटरी व इतर सर्व खातेप्रमुख, विभागाप्रमुख,सर्व कामगार व युनियन प्रतिनिधी इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments