पुनर्वसन न झाल्यास शेतकरी मंत्रालयात घुसतील!”- कॉ. आडम मास्तर
बैलगाडी आक्रोश मोर्चात खर्डा भाकरी खाऊन सरकारचा निषेध
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- पूरग्रस्त शेतकरी–शेतमजूर आणि श्रमिक जनतेच्या पुनर्वसनाची मागणी करत आज सोलापूरमध्ये अखिल भारतीय किसान सभा आणि सीटूच्या वतीने “बैलगाडी आक्रोश मोर्चा” काढण्यात आला. या मोर्चात शेकडो शेतकरी आपल्या बैलगाड्यांसह सहभागी झाले. सरकारकडून तातडीने पुनर्वसन न झाल्यास शेतकरी मंत्रालयात घुसतील, असा जळजळीत इशारा माजी आमदार कॉ. आडम मास्तर यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, कॉ. आडम मास्तर म्हणाले, “शेतकऱ्यांना १०० टक्के भरपाई कुणीच देऊ शकत नाही, परंतु शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे. यासाठी सरकारने जाहीर केलेले ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज हे केवळ दिखावा आहे. ६८ लाख हेक्टर पिकांचे नुकसान होऊनही दिलासा मिळालेला नाही. सरकारने जाहीर केलेली मदत विसंगत असून ती शेतकऱ्यांची चेष्टा आहे.”
त्यांनी पुढे सांगितले, “अब्जावधी रुपयांचे करबुडवे उद्योगपतींना सवलती देणारे हेच सरकार, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक पैसाही खर्च करत नाही. ही लाजिरवाणी बाब आहे.”
सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद पूनम गेट येथून बैलगाड्यांसह मोर्चा निघाला. शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना तेथेच बांधून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
पूरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी ज्वारीची भाकरी व खर्डा खाऊन प्रतीकात्मक निषेध नोंदविला. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, मात्र पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडविले.
सीटूचे राज्य उपाध्यक्ष कॉ. युसुफ शेख (मेजर) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
यावेळी राज्य महासचिव कॉ. एम.एच. शेख यांनी सांगितले की, “सोलापूर जिल्ह्यात १०० वर्षांतील सर्वात प्रचंड अतिवृष्टी झाली. भीमा–सीना नदीला आलेल्या पुरामुळे गावे वाहून गेली. महाराष्ट्रातील सुमारे ८० लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली असून १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शहरी भागातही जनजीवन विस्कळीत झाले आहे.” त्यांनी म्हटले, “शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या संकटातून उभे राहण्यासाठी सरकारकडून किमान दहा वर्षांची पुनर्बांधणी योजना आवश्यक आहे.”
यावेळी कॉ. नलिनीताई कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, सुनंदाताई बल्ला, शेवंताताई देशमुख, कॉ. विल्यम ससाणे,सुभाष बावकर, सुलेमान शेख, राजेंद्र स्वामी, मल्लिकार्जुन नाव्ही, दयानंद फताटे, उमेश पाटील, सदाशिव साळुंके, विश्वनाथ बसवेश्वर, श्रीशैल बुगडे आदींची उपस्थिती होती.
प्रजा नाट्य मंडळाच्या शाहिरांनी शेतकऱ्यांच्या जीवनसंघर्षाला भिडणारी गीते सादर करून उपस्थितांना भावनिक केले.
0 Comments