पूरबाधित कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील 115 गावांतील 15,114 कुटुंबे पूरपरिस्थितीमुळे बाधित झाली आहेत. या कुटुंबांचे जीवनावश्यक साहित्य भिजल्यामुळे वापरण्यायोग्य राहिलेले नाही. त्यामुळे बाधित कुटुंबांना तातडीने मदतीची आवश्यकता निर्माण झाली आहे. पालकमंत्री सोलापूर यांच्या मौखिक सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत आवश्यक मूलभूत व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेले एकात्मिक किट तयार करून पूरबाधित कुटुंबांना पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.
सदर किटमध्ये एकूण 25 वस्तूंचा समावेश असून त्यामध्ये 8 मूलभूत वस्तू एका पिशवीत व 17 जीवनावश्यक वस्तू दुसऱ्या पिशवीत ठेवण्यात येणार आहेत. दोन्ही पिशव्या एकत्र करून एक मोठी पिशवी तयार करण्यात येणार आहे.
किटमध्ये समाविष्ट वस्तू :
मूलभूत वस्तू (8): टूथब्रश (2), दंतमंजन पुडी (1), पेस्ट (मध्यम - 1), खोबरेल तेल (200 मि.ली. - 1), फणी (1), कंगवा (1), अंगाचे साबण (2 - एक मोती साबण), कपडे धुण्याचा साबण (1), बिस्फोट पुडे (3).
जीवनावश्यक वस्तू (17): गव्हाचा आटा (5 किग्रॅ), साखर (5 किग्रॅ), चहापत्ती (250 ग्रॅ), हरभरा दाळ (2 किग्रॅ), रवा (3 किग्रॅ), बेसन पीठ (1 किग्रॅ), स्वयंपाक तेल (2 किग्रॅ), मिठ (1 किग्रॅ), तिखट/गरम मसाला (100 ग्रॅ), हळद/जीरे (100 ग्रॅ), डालडा (500 ग्रॅ), शेंगदाणे (1 किग्रॅ), पोहे (2 किग्रॅ), गुळ (1 किग्रॅ), काडीपेटी (1 मोठा बॉक्स), अगरबत्ती (1 लहान पाकीट), मेणबत्ती (1 मोठे पॅकेट).
सदर किटचा पुरवठा 15,114 बाधित कुटुंबांना करण्यात येणार असून त्यासाठी खालील प्रमाणित संचलन प्रक्रिया (Standard Operating Procedure) निश्चित करण्यात आली आहे:
1. ग्रामस्तरीय दक्षता समितीची रचना: ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत कर्मचारी व कोतवाल हे सदस्य म्हणून नियुक्त असून त्यांच्या देखरेखीखाली किट वाटप करण्यात येईल.
2. तहसील कार्यालयाचे समन्वय: पुरवठा निरीक्षण अधिकारी संबंधित गावांचा रूट पुरवठादारास देतील. पुरवठादार त्या रूटनुसार प्रत्येक गावात किट पोहोच करेल.
3. तलाठीची जबाबदारी: ग्रामस्तरीय समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून तलाठी हे पुरवठादाराकडून किट प्राप्त करून त्याची पोहोच घेतील व ती जिल्हा पुरवठा कार्यालयास सादर करतील. किट पूरग्रस्तांना वाटप होईपर्यंत सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी पुरवठादाराची राहील.
4. दंवडीद्वारे माहिती प्रसार: किट वाटपाच्या पूर्वी गावात दंवडी देऊन लाभार्थ्यांना वाटपाची माहिती दिली जाईल.
5. लाभार्थी स्वाक्षरीसह पोहोच: किट वाटपानंतर लाभार्थी व समिती सदस्यांच्या स्वाक्षरीसह पोहोच घेऊन ती जिल्हा पुरवठा कार्यालयास सादर करण्यात येईल.
6. गैरप्रकारांची नोंद: कोणतीही उणीव किंवा गैरप्रकार आढळल्यास त्याबाबतचा अहवाल तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर करावा.
7. पात्रता सुनिश्चित करणे: अपात्र नागरिकांना किट वाटप होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याचीही खात्री करावी.
सदर कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
0 Comments