Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेचे साहित्य पुरस्कार जाहीर

 महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेचे साहित्य पुरस्कार जाहीर





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या सोलापूर  शाखा वर्धापन दिन व मराठी अभिजात भाषा दिनानिमित्त साहित्य पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आले आहेत. शनिवार दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता लोकमान्य टिळक सभागृह, सोलापूर येथे  हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अध्यक्षा डॉ. श्रुती वडगबाळकर आणि उपाध्यक्ष दत्ता सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
          या वर्षापासून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूर यांच्यावतीने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूरच्या वर्धापन दिन व मराठी अभिजात भाषा दिनानिमित्त मराठी साहित्य कृतींना पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. साहित्यिक , वरिष्ठ संपादक दुर्गेश सोनार ( मुंबई) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसाप सोलापूरच्या अध्यक्षा डॉ. श्रुती वडगबाळकर या राहणार आहेत.
          प्रसिद्ध लेखिका विजयाताई जहागीरदार स्मृती साहित्य पुरस्कार हा पुरस्कार विजयाताई जहागीरदार यांच्या परिवाराने पुरस्कृत केलेला असून तो उत्कृष्ट मराठी कविता संग्रहास दिला आहे. या पहिल्याच वर्षी किरण भावसार( सिन्नर, नाशिक) यांच्या "घामाचे संदर्भ" या कवितासंग्रहाला,  कै. निर्मलाताई उत्तरेश्वर मठपती स्मृती साहित्य पुरस्कार हा पुरस्कार श्री उत्तरेश्वर मठपती यांनी पुरस्कृत केला असून तो डॉ. अनंत सूर (यवतमाळ) यांच्या "कोंडमारा" या कथासंग्रहास, प्राचार्य डॉ. मधुकर कृष्णाजी झांबरे स्मृती साहित्य पुरस्कार विजया झांबरे यांनी पुरस्कृत केला असून वर्षा किडे - कुलकर्णी (नागपूर) यांच्या "काळिजफुल" या ललित लेख संग्रहास,  हॉटेल सूर्या एक्झिक्युटिव्ह उत्कृष्ट साहित्य पुरस्कार हॉटेल सूर्या एक्झिक्युटिव्हने पुरस्कृत केला असून तो मराठीतील अनुवादित साहित्य कृतीला दिला आहे. यावर्षी हा पुरस्कार डॉ. रेणूप्रसाद पत्की (सोलापूर) यांच्या "भटकंती" या पुस्तकाला दिला आहे. श्रीमती कमला श्रीवल्लभ चंडक स्मृती साहित्य पुरस्कार उ‌द्योजक किशोर चंडक यांनी पुरस्कृत केला असून विशाल मोहोड (अमरावती) यांच्या "कीड" या कादंबरीला तर स्वातंत्र्यसैनिक कै. महादेव भैरू शिंदे स्मृती साहित्य पुरस्कार साहित्यिक ना.म. शिंदे यांनी पुरस्कृत केला असून भारत सातपुते (लातूर) यांच्या "जागरण" या आत्मचरित्रास जाहीर करण्यात आला आहे.
 प्रत्येकी 5 हजार रुपये, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या सर्व पुरस्कारांचे स्वरूप आहे. या पुरस्कार सोहळ्याला सर्व साहित्य रसिकांनी  बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मसापच्या अध्यक्षा प्रा. डॉ. श्रुती  वडगबाळकर, दत्ता सुरवसे यांनी केले आहे.
        या पत्रकार परिषदेस प्रा. डॉ. अर्जुन व्हटकर, गोविंद काळे, फय्याज शेख, प्रा. भीमगोंडा पाटील आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments