बहुतांश पंचायत समित्यांवर महिलाराज
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती पदांसाठी शुक्रवारी (दि. 10) आरक्षण सोडत काढण्यात आली. यात 11 पैकी सहा पंचायत समित्यांचे सभापतिपद हे महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने जिल्ह्यात बहुतांश पंचायत समित्यांवर महिलाराज येणार असल्याचे सिद्ध झाले. आता सोमवारी (दि. 13) पंचायत सदस्यत्वाच्या आरक्षणाकडे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापदी पदासाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली. माढा, दक्षिण सोलापूर व माळशिरस या तीनही पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्याने या तालुक्यात सभापती पदासाठी मोठी चुरस होणार, हे स्पष्ट झाले. पंढरपूर आणि उत्तर सोलापूर या दोन पंचायत समितीचे सभापतिपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाले.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) सभापती पदासाठी बार्शी, करमाळा, सांगोला, मोहोळ, माळशिरस, अक्कलकोट, मंगळवेढा या सात तालुक्यातून तीन चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यातून मोहोळ, अक्कलकोट, करमाळा या तीन पंचायत समितीचे सभापती पद ओबीसीसाठी आरक्षित झाले. यानंतर माळशिरस, माढा, सांगोला या तीन तालुक्यातून सर्वसाधारण महिलेसाठी एक चिठ्ठी काढण्यात आली. त्यात सांगोला महिलासाठी राखीव झाले.
आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, नायब तहसीलदार सुरेंद्र परदेशीमठ, अव्वल कारकून दीपक ठेंगील, मल्हारी नाईकनवरे, पुष्पावती साखरे, प्रताप काळे यांनी सहभाग घेतला.
0 Comments