पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘काळी दिवाळी आंदोलन’;
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा सरकारविरोधी हल्लाबोल
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- अतिवृष्टी, सलग पावसाच्या सरी आणि पुराच्या तडाख्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांची पिके वाहून गेली, जनावरांचे जीव गेले, घरं पडली आणि शेतीमाल पाण्यात वाहून गेला. बळीराजा आक्रोश करत असताना राज्य सरकारकडून केवळ तुटपुंजी आणि दिखाऊ मदत जाहीर करण्यात आली. या अन्यायाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘काळी दिवाळी आंदोलन’ करत शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार धैर्यशील मोहीते -पाटील यांनी केले.
शेतकऱ्यांच्या आयुष्यात या वर्षी आनंदाची नाही तर ‘काळी दिवाळी’ आली आहे, असा हळहळीत सूर यावेळी आंदोलनात उमटला. काळे झेंडे आणि संतप्त घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. “शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांची होळी करणाऱ्या या सरकारला जागं करा”, “पूरग्रस्तांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही” अशा घोषणा देत संतप्त जमावाने प्रशासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनादरम्यान पक्षाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹५०,००० ची तातडीची आर्थिक मदत, तसेच नुकसानग्रस्तांसाठी पुनर्वसन निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित आणि पारदर्शक पद्धतीने करून मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणीही खा. मोहिते पाटील यांनी केली.
या आंदोलनात आमदार उत्तमराव जानकर, जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, सुधीर खरटमल यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने बळीराजाच्या न्यायासाठी लढा देण्याची शपथ घेतली.
आंदोलनादरम्यान नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल करत सांगितले की, “पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष गप्प बसणार नाही. बळीराजाच्या डोळ्यातले अश्रू सरकारला दिसत नसतील, तर आम्ही ती ‘काळी दिवाळी’ करून दाखवू. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरूच राहील.”
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आजही तातडीच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शासकीय आश्वासने केवळ कागदांपुरती मर्यादित राहिली आहेत, तर जमिनीवर परिस्थिती गंभीर आहे. बळीराजाचे आयुष्य सावरण्यासाठी शासनाने केवळ आश्वासने नव्हे, तर ठोस कृती केली पाहिजे असा एकमुखी इशाराही या आंदोलनातून सरकारला देण्यात आला.
0 Comments