सोलापूरात अतिवृष्टीमुळे पूर; ढगफुटीने शहराला पाण्याचा विळखा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 12, 2025

सोलापूरात अतिवृष्टीमुळे पूर; ढगफुटीने शहराला पाण्याचा विळखा

 सोलापूरात अतिवृष्टीमुळे पूर; ढगफुटीने शहराला पाण्याचा विळखा







आभाळ कोसळलं; रस्ते अन् घराला तलावाचं स्वरुप, कुटुंब उघड्यावर


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- परतीच्या पावसाला पुढील आठवड्यात सुरुवात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र राज्यातील काही भागात पाऊस सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहे. सोलापुरात 24 तासात अतिवृष्टी झाली असून रात्रभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपलं आहे.

त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून पूरस्थिती निर्माण झाली आहे.

हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, मागील 24 तासात 118.3 मिमी पावसाचे नोंद झाली आहे. विशेष म्हणजे सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द, सांगवी बुद्रुक, चपाळगाव, चुंगी या गावांमध्ये रात्रभर मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. जुलै-ऑगस्टमध्ये आधीच भरून वाहणारे ओढे-नाले रात्रीच्या पावसामुळे ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्पातून सकाळी 6 वाजता 4000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याआधी हा विसर्ग 1500 क्युसेक होता. त्यामुळे बोरी नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना नदीजवळ न जाण्याचे आणि पाणी वाहत असताना कोणत्याही पूल न ओलांडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रात्रीच्या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते, विशेषतः सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील पंजवानी मार्केट आणि होटगी रोड तलाव परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तसेच सर्व्हिस रोडने प्रवास करणाऱ्यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुना विडी घरकुल परिसरात, मित्र नगर, शेळगी या भागांमध्ये पाणी घरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरांमध्ये 2-3 फूटपर्यंत पाणी घुसल्याचे दृश्य पाहायला मिळत असून स्थानिक नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. शहरातील 256 गाळा परिसरात ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात घुसले, त्यामुळे अनेकांना रात्रभर जागून काढावी लागली. तसेच संसारुपयोगी साहित्यामध्ये पाणी शिरल्याने सोलापुरातील महिलांना अश्रू अनावर झाले.

सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सोलापुरात रात्रभरात तब्बल ११८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर गाड्याही पाण्याखाली गेल्या आहेत.

सोलापूर शहरातील शेळगी भागासह अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये पाणी साचल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेल्या या दृश्यांमध्ये पावसाचा हाहाकार स्पष्टपणे दिसत आहे. सोलापुरातील अनेक घरांमध्ये २ ते ३ फूट पाणी साचल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

अक्कलकोट रोड परिसरातील वज्रेश्वरी नगर आणि २५६ गाळा परिसरातील नागरिकांच्या घरातही पाणी शिरले आहे. या भागातील टॉवेल आणि विडी कारखान्यांमध्येही ५-६ फूट पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले आहे.

या पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी तातडीने पाहणी दौरा केला. त्यांनी नागरिकांना धीर देत तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेश दिले.ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे, त्यांना आर्थिक मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, शहरातील पूर्व भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अक्कलकोट रोडवरील एका टॉवेल कारखान्याच्या मालकाने सांगितले की, नवीन रस्त्याचे काम झाल्यामुळे पाणी साचायला सुरुवात झाली. यासंदर्भात त्यांनी यापूर्वीच महापालिकेकडे तक्रार केली होती, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे त्यांच्या कारखान्यातील सुमारे २५ लाख रुपयांचा माल पाण्यात वाहून गेला आहे.

तसेच या ठिकाणी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने घरातील धान्य आणि इतर सामानही पूर्णपणे भिजले आहे. शहरातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत, ज्यामुळे पाण्याचा निचरा होण्यात अडथळे येत आहेत, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्तांनी दिली.

सोलापुरात काही ठिकाणी हायवेची कामे झाली आहेत, पण क्रॉसलाईन न टाकल्यामुळे ही गंभीर परिस्थिती उद्भवली. यावर उपाय म्हणून लवकरच अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार सोलापुर जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलंय. पावसाचा जोर इतका होता की, जणू जिल्ह्यावर आभाळ कोसळल्याची परिस्थिती असल्याचं चित्र पाहायला मिळालं.

या पावसामुळे सोलापुरातील रस्ते आणि घरांना तलावाचं स्वरुप आलं असून अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत.
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापुर शहरातील जुना विडी घरकुल परिसरातील सर्वच घरात पाणी शिरल्याची परिस्थिती पाहायला मिळतेयं. तर अक्कलकोट रोड,, पंजावणी मार्केट, होटगी रोड परिसरात तलावाचं स्वरुप आलं आहे. घरात पाणी शिरल्याने नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं असून संपूर्ण रात्र पावसात भिजत काढल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. घरात पाणीच पाणी झाल्याने अनेक कुटुंबांच्या संसारपयोगी वस्तू साहित्य अस्ताव्यस्त झाले आहेत.

चौकट -

महापालिका आयुक्त ऑन द स्पॉट; नागरिकांना दिला दिलासा

सोलापूर शहरांमध्ये गुरुवारी पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण सोलापूर जलमय झाले ते चित्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून पाहायला मिळत आहे.
विशेष करून हैदराबाद रोडवरील जुन्या विधी घरकुल मध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर सुद्धा गुडघ्यावर पाणी अजून सुद्धा थांबून आहे. त्यामुळे या पावसाचा अंदाज येतो.
दरम्यान ही माहिती मिळताच महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तातडीने आपल्या यंत्रणे सह विडी घरकुल मध्ये पाहणी केली. यावेळी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, यांचे चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख तसेच या भागाचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनीसुद्धा आहेत पण सोबत पाहणी केली.
जुना विडी घरकुल परिसरासह मित्र नगर शेळगी या भागातील घरांमध्ये पाणी घुसले आहे. महापालिका आयुक्त स्वतः आल्याने नागरिकांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. आयुक्तांनी नागरिकांना दिलासा देताना आपल्या यंत्रणेला तातडीचे आदेश देत नाल्यांमधून नागरी वस्तीमध्ये घुसलेल्या पाण्याला वाट करून देण्याच्या सूचना केल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages